

Mumbai Garjana Morcha: मतदारयाद्यांमधून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांवरून सध्या देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विराट ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी थेट निवडणूक आयोग आणि भाजपवर घणाघाती टीका केली.
मोर्चादरम्यान माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, "विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिक मतदारयाद्यांमधील गोंधळाबाबत थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना प्रश्न विचारत आहेत. असे असताना भाजपला एवढा जळफळाट का होत आहे? भाजप निवडणूक आयोगाची बाजू घेऊन ढाल का बनतेय?" या वेळी त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई हेदेखील उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या दोन उपायुक्तांनी घेतलेल्या हरकतींनंतर आयोगाच्या कारभारावर देशभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत. राज्य सरकार व भाजप नेत्यांनी विरोधकांचे हे आरोप म्हणजे ‘फेक नरेटिव्ह’ असल्याचे म्हटले होते. त्याला परब यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
या मोर्चात मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वर्षांनुवर्षे मतदान करणाऱ्या अनेक नागरिकांनी, आपल्याकडे पासपोर्ट, रेशन कार्ड यांसारखी सर्व वैध ओळखपत्रे असूनही मतदारयाद्यांमधून नावे गायब झाल्याचा दावा केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळाला.
आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. मतदारांची नावे कोणत्या प्रक्रियेद्वारे आणि कोणाच्या सांगण्यावरून वगळण्यात आली, याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली.
या गर्जना मोर्चात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेसोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सभेत बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मतदारयाद्यांमधील गोंधळावरून निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.