राज्यात आज गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
तत्त्वांशी तडजोड करत, नीतीमत्तेची चाळण करणारे समाजभेदी विचार डोकं वर काढत आहेत. आपल्या एका मताने परिवर्तनाची तुतारी संपूर्ण महाराष्ट्रात निनादू शकते, असे आवाहन जयंतरावांनी राज्यातील जनतेला केले आहे.
स्वार्थाच्या बाजारात तत्त्वे, निष्ठा विक्रीस काढण्यात आली आहेत. या नकारात्मकतेवर मात करायची असेल तर परिवर्तनाची वाट धरावी लागेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या एका मताने परिवर्तनाची तुतारी संपूर्ण महाराष्ट्रात निनादू शकते, असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नमस्कार,
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व बंधू-भगिनींना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
अनेक महापुरुषांचा वारसा असणारे आपले महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. या राज्यात आपण जन्मलो हे आपले भाग्य. अठरापगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. संतांच्या वाणीने पावन झालेल्या भूमीत जसे महाकाय सह्याद्री आणि विशाल अरबी समुद्र एकत्र नांदले. तसेच अनेक धर्म, भाषा, साहित्य, संस्कृती एकत्र नांदल्या आणि भरभराटीस आल्या.
येथे राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वीरतेची कथा लिहिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री-पुरुष समानतेची तोरणे बांधली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांचा मळवट शिक्षणाने भरला. छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील विषमतेच्या रेखा पुसट केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर स्वातंत्र्यानंतर घटनेतच समानतेचा अधिकार दिला. हा सर्वसमावेशक समृद्ध वारसा पुढे नेणारे महाराष्ट्र संपूर्ण देशासाठी दिशादर्शक राज्य ठरले.
मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. तत्त्वांशी तडजोड करत, नीतीमत्तेची चाळण करणारे समाजभेदी विचार डोकं वर काढते आहे. राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव झाला आहे. सातत्याने होणाऱ्या गुन्ह्यांच्या शृंखलेत राज्य बिथरले आहे. कृषी संस्कृती आपल्या छातीवर मिरवणारी ही काळी माती संकटात आहे. माझा शेतकरी बांधव हतबल आहे. राज्याचे भविष्य साकारणारा तरुण स्वतःच्याच भविष्याबद्दल अनभिज्ञ आहे. स्वार्थाच्या बाजारात तत्त्वे, निष्ठा विक्रीस काढण्यात आली आहेत. या नकारात्मकतेवर मात करायची असेल तर परिवर्तनाची वाट धरावी लागेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या एका मताने परिवर्तनाची तुतारी संपूर्ण महाराष्ट्रात निनादू शकते.
त्यामुळे यंदाच्या पाडव्यासाठी निष्ठेच्या काठीला पुरोगामी विचारांचे वस्त्र बांधूयात. तत्त्व, नीतिमत्ता यांची हार-फुले चाढवूयात. कडुलिंबाप्रमाणे सत्य कितीही कटू असले तरी त्याच्याच माळा लावूयात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा लखलखीत कलश त्यावर ठेवून लोकशाहीची गुढी सदैव उंच राहील याची प्रतिज्ञा करूयात.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.