
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak ) या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पण त्यांना सातारा पोलिस ताब्यात घेणार आहेत. न्यायालयाने त्यांचा ताबा घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांचा मुक्काम सातारा येथे असणार आहे.
सदावर्ते यांची पोलीस कोठडी बुधवारी संपत होती. त्यासाठी पोलिसांनी त्यांनी सत्र न्यायालयात हजर करून कोठडीत वाढ कऱण्याची मागणी केली. पण सदावर्ते यांच्या वकिलांनी त्यास जोरदार विरोध केला. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. पण आता इतर प्रकरणांची कलमेही यात वाढवली जात असून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले.
न्यायालयाने ही बाजू ग्राह्य धरून सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांना शनिवार 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्ते यांना आर्थर रोड तुरूंगात हलवण्यात आलं आहे. याचवेळी सातारा पोलिसांनीही सदावर्ते यांचा ताबा न्यायालयाकडे मागितला होता. सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी एका वृत्तवाहिनीवर बेताल वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. मात्र आता त्यांना या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत आले आहेत.
न्यायालयाने सातारा पोलिसांना सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी 16 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार सातारा पोलिसांकडून आर्थर रोड तुरूंग प्रशासनाकडे याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून सदावर्ते यांना ताब्यात घेतलं जाईल. त्यांना साताऱ्यातील न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकतात. त्यामुळे आता सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणात नागपूर कनेक्शन असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता पोलिसांनी आंदोलनाशी संबंधित नागपूरमधील 'त्या' व्यक्तीचा छडा लावल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अभिषेक पाटील, कृष्णात मोरे, सच्चिदानंद पुरी, चंद्रकांत सुर्यवंशी, ताज्जुदीन शेख आणि इतर आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नागपूरमधील व्यक्तीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. आंदोलनाशी संबंधित काही अॉडिओ क्लिपही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. सुर्यंवशीच्या तपासात रात्री ११ ते पहाटे २:५० पर्यंत सदावर्तेंच्या इमारतीच्या टेरेसवर जयश्री पाटील, नागपूरची व्यक्ती, आणि इतरांची बैठक झाली. या बैठकीत जयश्री पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले, त्याही आरोपी असून सध्या फरार आहेत. ८ एप्रिल रोजी सदावर्तेंनी नागपूरच्या व्यक्तीला फोन केला होता. त्यावेळी ती व्यक्ती मुंबईतच होती. आंदोलन नागपूरची व्यक्ती हाताळत होती, अशी माहिती घरत यांनी दिली.
सदावर्तेंची डायरी सापडली
सदावर्ते यांनी सर्व पैशांचा हिशोब लिहून ठेवला असून ती डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीतील नागरिकांची लिहिलेली नावे यांची चौकशी होणं गरजेचं आहे. सदावर्तेंनी विविध एसटी डेपोतून कामगारांकडून पैसेगोळा केले आहेत. काही एसटी कामगाराचेही पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. या गुन्ह्यात कलम ४०६ आणि कलम ४०९ वाढवलेले आहेत. कोट्यावधी रुपयाचा अपहार झाला आहे, असं घरत यांनी न्यायालयात सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.