Hitendra Thakur News : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांची निवड शनिवारी पार पडली. भाजपचे अरुण पाटील यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसच्या भाग्यश्री भोईर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. हा निकाल बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-आमदार किसन कथोरे-हितेंद्र ठाकूर यांच्या सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे अध्यक्ष देखील हितेंद्र ठाकूर यांच्या गटाचा होणार हे निश्चित मानले जात होते. मात्र, भाजपमधील अंतर्गत वाद मिटवत किसन कथोरे आणि कपिल पाटील एकत्र आले. तर, बविआच्या काही संचालकांनी क्राॅस व्होटींग केले. त्यामुळे ठाकूर यांचे उमेदवार मनिष पाटील यांचा पराभव झाला.
अध्यक्षपदासाठी मनीष राजेंद्र पाटील, अरुण पाटील आणि आकाश बाबाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आकाश पाटील यांनी माघार घेतल्यानंतर अरुण पाटील यांना १४, तर मनीष पाटील यांना सात मते मिळाली.
भाजप आमदार किसन कथोरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. २७ जूनला झालेल्या मतदानात चार हजार २१ मतदारांपैकी तीन हजार ८९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ९६.८४ टक्के इतक्या विक्रमी मतदानानंतर २८ जूनला मतमोजणी झाली.
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागांवर विजय मिळवला. ११ संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे आठ उमेदवार विजयी झाले, तर परिवर्तन पॅनेलचे दोन आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आले. विक्रमगड मतदारसंघातून नीलेश सांबरे यांनी जागा कायम राखली.
उपाध्यक्षपदासाठी ज्योती पाटकर, भाग्यश्री भोईर आणि अमित घोडा यांनी अर्ज दाखल केले होते; मात्र ज्योती पाटकर आणि अमित घोडा यांनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसच्या भाग्यश्री भोईर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.