

Mumbai News, 10 Apr : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदवली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेलं 'ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढी आंखों पे चश्मा, हाय; मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आये..' हे गाणं आपल्या व्यवसायाचा भाग असून विनोद करणं हा माझा व्यवसाय असल्याचं सांगितलं आहे.
तसंच विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदवताना कुणाल कामरा यांनी आपण कोणतीही चूक केली नसून या प्रकरणी आपण माफी मागणार नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यासमोर कामरा यांची सुनावणी पार पडली.
बैठकीत हक्कभंग आणणारे भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कामरा यांच्या साक्षी या सुनावणीत नोंदवण्यात आल्या. तर या सुनावणीची माहिती देतना प्रसाद लाड यांनी सांगितले की, "कुणाल कामरा प्रकरणातील ही तिसरी, चौथी सुनावणी होती. आम्ही त्याचा जबाब नोंदवून घेतला. या प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तसेच, कामराला उलट तपासणीसाठी बोलावण्यात आले होते.
कुणाल कामरा आणि प्रवीण दरेकर या दोघांचीही समोरासमोर चौकशी झाली. कुणाल कामरा यांना एकूण 24 प्रश्न विचारण्यात आले; या दरम्यान त्यांनी आपली भूमिका मांडली आणि आपल्या चुकांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. याव्यतिरिक्त, त्यांनी घटनात्मक अधिकार तसेच विशेषाधिकार समितीच्या अधिकारांविषयी प्रश्न उपस्थित करण्याचाही प्रयत्न केला.
त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. या प्रकरणी ते माफी मागणार की नाही, हे त्यांच्या वकिलांमार्फत नंतर कळवले जाणार आहे, असं लाड यांनी सांगितलं. मात्र, लाड यांच्या या प्रतिक्रियेनंतर कुणाल कामरा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं.
कामरा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "आज संध्याकाळी माझी जी चौकशी झाली, त्यातील शेवटचे तीन प्रश्न मला आठवतात. ते पुढीलप्रमाणे होते - तुम्हाला काही पश्चात्ताप वाटतो का? - नाही. तुम्ही जे बोललात, त्याबद्दल तुम्हाला काही खेद वाटतो का? - नाही. जर तुम्ही बिनशर्त माफी मागितली, तर या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाईल.
यावरही कामरा यांनी नाही असं उत्तर दिल्याचं सांगत. मी असे करू शकत नाही. कारण माझी माफी प्रामाणिक (खरी) नसेल आणि त्यामुळे मी ती मागितली तर इतर कलाकारांसाठी आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी एक चुकीचा पायंडा पडेल", असं म्हणत कामरा यांनी आपण माफी मागणार नाही, असं पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.