मुंबई : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येईल, असे वातावरण आज पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. धक्काबुक्कीही झाली.
पावसाळी अधिवेशनात गेली चार दिवस खोक्यांच्या घोषणाबाजीवरुन राजकारण तापलं आहे. रोज विरोधक या पायऱ्यावर आंदोलन करीत होत, आज सत्ताधाऱ्यांनी या पायऱ्यांवर आंदोलन करीत आघाडी सरकार, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विरोधकात घोषणाबाजी केली.
सकाळी दहा वाजता भाजपचे आमदार पायऱ्यांवर आले, त्यावेळी बंडखोर आमदार याठिकाणी होते. त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यास सुरवात केली. दहा मिनिटे ही घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात होते. भाजप-बंडखोर आमदार आंदोलन करीत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार माध्यमांशी बोलत होते. 'चार दिवस आम्ही त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्या घोषणा त्यांना झोंबल्या.त्यामुळे त्यांनी आज पायऱ्यांवर आंदोलन केले आहे," असे अजित पवार सांगत असतानाच पाठीमागून राष्ट्रवादीचे आमदार हातात गाजर घेऊन पायऱ्यांवर आले. यावेळी अमोल मिटकरी हे पायऱ्यांवर येत असताना त्यांचा धक्का आमदार महेश शिंदे यांना लागला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेही त्या ठिकाणी आले. यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. हा वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मध्यस्थी केली.
"शिंदे गटाच्या आमदारांना आमच्या घोषणा झोंबल्या. यामुळेच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्याने हे निष्पन्न झाले आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत. आतापर्यंत सत्ताधारीपक्षाने कधीच पायऱ्यांवर आंदोलन केले नाही. आम्ही सत्तेत असतानाही विरोधकांनी पायऱ्यांवर येऊन घोषणाबाजी केली. आम्ही त्यांना कधीच अडवले नाही. चोराच्या मनात चांदणे, असा प्रकार आज हा घडला आहे," असे अजित पवार म्हणाले.
"आम्ही जे केले नाही ते आरोप विरोधकांनी केले. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही," असे शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. 50 खोके आम्ही काही घेतले नाही, यांचे अनिल देशमुख, नवाब मलिक आतमध्ये का बसलेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"सगळा घोटाळा बाहेर काढल्याने पोटशूळ उठला. आम्ही काम करत होतो आणि हे लोक त्यावेळी खात होते,त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली नाही आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली," अशी कबुली गोगावलें यांनी केली.
कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, वाझेचे खोके- मातोश्री ओके, लवासाचे खोके-बारामती ओके, अशा घोषणा सत्ताधारी पक्षाने दिल्या. तर ‘50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ 'गाजर देणे बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा', अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, "विरोधकांनी टीका करताना विचार करुन टीका करायला हवी. अंगावर आले तर कुणीही शिंगावर घेते. सुरूवात झाली नसती तर असे झाले नसते,"
"आमच्याकडून कुणाला धमकावण्याचा प्रयत्न नाही, विरोधीपक्ष वैफल्यग्रस्त आहे.विरोधकांना केवळ राडा करायचा आहे. त्यांना केवळ नौटंकी करायची आहे. लक्ष वेधण्यासाठी विरोधकांकडून हे सर्व सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.