

Assembly house controversy Maharashtra : विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान फडणवीस यांनी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसह अनेक घोषणांचा पाऊस पाडला. त्यापैकीच एक घोषणा म्हणजे सातारा जिल्ह्यातील दरे गाव परिसरात निसर्गोपचार केंद्राची.
दरे हे गाव आहे खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे. ते अधूनमधून शेतीची पाहणी आणि कामे करण्यासाठी गावाला जात असतात. त्यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका-टिप्पणीही केली जाते. आजही विरोधकांनी ही संधी सोडली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्याची घोषणा करताच विरोधी बाकांवर कुजबुज सुरू झाली.
फडणवीस यांच्याकडून केंद्राबाबत घोषणा केल्यानंतर विरोधी बाकावरून आदित्य ठाकरेंसह अन्य काही सदस्य मुख्यमंत्र्यांच्या दिशेने काहीतरी बोलत असताना दिसले. फडणवीस यांच्याशेजारीत शिंदेही बसले होते. त्यामुळे ठाकरेंचा रोख शिंदेंकडेच होता का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य ठाकरे हे हातवारे करून बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. शिंदे यांनीही मिश्कील हास्य करत नॅचरोपॅथी असं म्हणत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनीही लगेच विरोधकांना उद्देशून तुम्ही निसर्गोपचार केंद्रात भेट द्यायला या, म्हणजे तुम्हाला समजेल, असा टोला लगावला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मीडियाशी बोलताना या केंद्रांवरून फडणवीस आणि शिंदे यांना टोला लगावला. दरम्यान, निसर्गोपचार केंद्राची माहिती देताना फडणवीस यांनी सांगितले की, मानसिक आरोग्य, जीवनशैलीजन्य आजार, ताणतणाव तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांसाठी हे केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात आरोग्य सेवांचा विस्तार करून या सेवा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
आयुष्यमान भारत तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या योजनांमधील रुग्णालयांची संख्या, आजारांची संख्याही वाढविण्यात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. ठराविक गंभीर आजारांवरील उपचारासाठी सरकारकडून २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.