Daud News: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. सरकारने आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी आपले उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले; पण यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा महाराष्ट्रभर दौरा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठं भाष्य केलं.
"अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. अशी कोणतीही गोष्ट होणार नाही. हे मी मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या तोंडावर सांगून आलो होतो; पण जरांगे पाटलांना बोलायला कोण सांगत आहे, निवडणुकीच्या तोंडावर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल," असे विधान राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यात गुरुवारी माध्यमांशी बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यानंतर राज ठाकरे यांच्या विधानाला मनोज जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर देत थेट आव्हान दिलं आहे. "राज ठाकरे यांनी ते शोधून काढावं, आम्हालादेखील ऐकायचं आहे, या मागे कोण आहे ? तुम्ही शोधावं आणि आम्हाला पण सांगावं, मराठा समाजाचे कल्याण व्हायला लागले, की असे खोटे आरोप करून पुड्या सोडल्या जातात, पण मराठा समाज आता कोणाचेही ऐकणार नाही. मराठा समाजाला स्पष्ट माहिती झाले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि आम्ही ते मिळवणारच," असे जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास अनेकदा विरोध बोलून दाखवला आहे. त्यावरून जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. यानंतर आता राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.