Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी (ता.22) जाहीर होणार आहे. मात्र, या निवडणुकीआधीच विविध एक्झिट पोलकडून राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर बहुतांश एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मात्र, या एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, राज्यात आम्हीच सरकार स्थापन करणार, असं वक्तव्य खासदार संजय राऊत केलं आहे.
लोकसभेला आम्हाला केवळ 10 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्याचं निकालानंतर काय झालं? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. तसंच महायुतीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांन पैशांची ऑफर दिली जात आहे. याचाच अर्थ आम्ही जिंकतोय, असा विश्वास देखील राऊतांनी (Sanjay Raut) व्यक्त केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, अपक्ष उमेदवार आमच्याकडे आतापासून पाठिंब्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे जे लोक उशाला नोटांचे बंडल घेऊन झोपतात, गादीमध्ये पैसे ठेवून झोपतात ते 50-50 ते 100-100 कोटींची ऑफर अपक्षांना देत आहेत.
याचा अर्थ आम्ही जिंकतोय, हे त्या सर्व्हेवाल्यांना सांगा. जिंकण्याची खात्री असती तर अशा पैशांच्या थैल्या पाठवल्या नसत्या, असं राऊत म्हणाले. तसंच आम्ही जर 160 जागांवर जिंकत असू तर मग एक्झिट पोल कोणी केले. कुठल्या तरी कंपन्या येतात. काहीतरी एक्झिट पोल करतात. आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आम्ही 26 नोव्हेंबरला सरकार बनवणार आहोत, असा दावाही राऊतांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.