Maratha Reservation Update News : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा आजचा मुक्काम हा नवी मुंबई असणार आहे. जरांगे पाटील यांनी आजच्या आज सरकारला अध्यादेश काढण्यास सांगितला आहे, अन्यथा ते मुंबईत येऊन आंदोलन करतील असा निर्धार त्यांनी शुक्रवारी (ता.26) जरांगेंनी व्यक्त केला आहे. त्याचं अनुषंगाने सरकार आता अॅक्शन मोडवर आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबत तातडीची बैठक बोलावली. हा नवीन अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांना लवकरात लवकरच पाठवण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संध्याकाळी भाषणात नमूद केलं होतं की, आजच्या आज अध्यादेश नाही निघाला तर मग मराठा बांधव उद्या मुंबईला येतील. जर अध्यादेश मिळाला आणि तो योग्य असला तर ते गुलाल उधळायला मुंबईला येतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे जरांगे पाटील उद्या मुंबईत आंदोलन करायला येणार आहेत की गुलाल उधळायला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठा आंदोलनामुळे (Maratha Protest) एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्याचबरोबर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी मिळाव्यात यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय सामोर आला आहे. अत्यावश्यक वस्तू घेऊन एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या गाड्या, उद्या मार्केटमध्ये न आणता थेट मुंबई, ठाणे व इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात मार्केटमध्ये पुरवण्यासाठी सरकारची मुभा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा पनवेलनंतर थेट एमटीएचएल मार्गे मुंबईत विविध भाजी मंडई आणि भाजी मार्केट पोहोचवण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह आलेल्या लाखो मराठा बांधवांचा मुक्काम नवी मुंबईत वाढला आहे. मुक्काम वाढल्याने एपीएमसी बाजारपेठ उद्या सुरु राहणार की बंद याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला.
पण आता एपीएमसी कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज यांनी जोपर्यंत मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत आहेत तोपर्यंत एपीएमसी बाजारपेठ सुरु करू शकत नाही. आमचं कितीही नुकसान झाले, मुंबईला भाजीपाला पुरवठा झाला नाही तरी चालेल, त्याचा विचार सरकारने करावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजीपाला पुरवठ्यावर देखील याचा परिणाम होणार आहे.
"शासनाच्या वतीने सकाळी आपल्यासोबत चर्चा झाली. आपण आपल्या मागण्यांसाठी मुंबईपर्यंत आलो आहोत. जातीच्या पदरात गुलाल टाकण्यासाठी आपण इथं आलो आहोत. सरकारकडून मंत्री आले नाहीत, मात्र सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे हे सारासार निर्णय घेऊन आले. सरकारने त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडली. 54 लाख कुणबी नोंद सापडलेल्यांना प्रमाणपत्र द्या, अशी आपली मागणी होती.
दुसरी मागणी होती की, या नोंदींची माहिती ग्रामपंचायतीसमोर लावा. सरकारने आता नोंदी मिळालेल्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी आपली मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. (Maratha Reservation)
वंशावळ जुळवणीसाठी समिती जाहीर करण्यात आली आहे. अर्जच नाही केला तर प्रमाणपत्र मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही अर्ज करायला सुरुवात करा. 54 लाख कुणबी नोंदींपैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याचं सरकारने सांगितलंय," असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे अध्यादेश योग्य असल्यास मनोज जरांगे पाटील हे गुलाल उधळायला उद्या मुंबईत येणार आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.