

Mumbai Political news : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा, नाहीतर उद्यापासून पुन्हा पाणी पिणे बंद करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या हालचालीही वाढल्या आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मंगळवारी (ता. ३१) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. जवळपास दीड तासाहून अधिक वेळ ही बैठक चालली. मराठा समाजाची (Maratha Reservation) आक्रमकता थांबवण्यासाठी राज्य सरकार दोनदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या अद्यादेशाला राज्यपालांची मान्यता घेतली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे
यासोबतच राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाही आटोक्यात राहावी, यासाठी विरोधी पक्षांनी राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत केले जाणार आहे. सह्याद्री अतिथिगृहावर होणाऱ्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या बैठकीला निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकाही केली, पण मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही सर्वपक्षांच्या प्रमुखांना बोलवले आहे. उद्धव ठाकरे यांनीही आजच्या बैठकीला यावे, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.
मात्र, खासदार संजय राऊत यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी या सरकारचे काय करायचे, असा प्रश्नच राऊतांनी उपस्थित केला आहे." महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांनादेखील बोलावले, पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको, पण प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशेबाचे वेळ जवळ येत आहे," असे ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.