Mumbai News : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला असून, राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील काही पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आपल्या पदाचे राजीनामेही दिले आहेत. अशातच हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, यासंदर्भातील राजीनामा दिलेले पत्रदेखील व्हायरल झाले आहे. हेमंत पाटील यांनी राजीनामा देताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घेत हेमंत पाटलांना तातडीने भेटीसाठी बोलावले असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात वणवा पेटला आहे. अशाताच मराठा समाजाची जनभावना लक्षात घेत खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा देण्याबाबत इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी थेट लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहित राजीनामा दिला.
यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत पाटील यांना तातडीने भेटीसाठी बोलावले असून, हेमंत पाटील सोमवारी सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि हेमंत पाटील यांच्यात काय चर्चा होती, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.