Mumbai News : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी (ता.24 )संपणार आहे. या आधीच त्यांनी वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंची बीडमध्ये विराट सभा झाली. या सभेकडे सरकारसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते.जरांगेंनी सभेत 20 जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण पुकारणार असल्याची घोषणा केली. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारला इशारा देतानाच मंत्री छगन भुजबळांचाही चांगलाच समाचार घेतला.यावर आता भुजबळांनी जोरदार पलटवार केला आहे.
मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.त्यांनी जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देतानाच क्युरेटिव्ह पिटीशनवर देखील भाष्य केले. भुजबळ म्हणाले,मनोज जरांगे पाटलांची बीडमध्ये जी सभा झाली, त्यातलं अर्धे भाषण हे माझ्यावरतीच होतं.आणि अर्धे ते लेकरं वगैरे नेहमीप्रमाणे होतं. भुजबळांच्या विरोधात बोललं नाहीतर ते भाषण करणार तरी काय.हा मुद्दा त्यांच्यासमोर येणं स्वाभाविक आहे.
भुजबळ म्हणाले, मी सगेसोयरांना,व्याह्यांना, त्यांच्या व्याह्यांना आरक्षण द्या असं म्हटलं होतं. पण आज त्यांच्या भाषणात तो मुद्दा आलाच नाही.त्यांच्या स्मरणशक्तीत मला थोडीशी गडबड वाटते आहे. ते दुहेरी बोलतात. ते सुरुवातीला म्हणाले, बीडमधील हाॅटेल,प्रकाश सोळकें, आमदार क्षीरसागरांचे घरं, आॅफिसेस भुजबळांनी जाळलं. अगोदर ते म्हणाले होते, अधिकाऱ्यांनी जाळलं.आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले, आमच्या मराठा समाजावर डाग लावता. मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका,वाट्याला गेलात तर काय होतं ते लक्षात ठेवा. तर मग बीडमध्ये जे काही घडलं ती जाळपोळ केल्याची अप्रत्यक्ष कबुली आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित करत जरांगेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.(Maratha Reservation)
तसेच राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्यावरही मंत्री छगन भुजबळांनी भाष्य केले. ते म्हणाले, ही क्युरेटिव्ह पिटीशन न्यायालयाने स्वीकारणे म्हणजे दाखल म्हणजे सरकारला मोठा दिलासा आहे. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल स्वीकारली आहे. आता त्यात जे सर्वोच्च न्यायालयात जे न्यायाधीश असतील ते मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्हवर चर्चा करतील.पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या,अशीच आमची मागणी आहे. सुप्रीम कोर्ट निर्माण केलेला अडथळा दूर करेल, असे ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जरांगे मला मित्र मानत नाही, त्यामुळे मी त्यांना मित्र म्हणणार नाही.पण त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. त्यांची छाती १२ इंचाची आहे. ती जास्त ठोकू नका.ती ठोकून ठोकून उगाच जास्तीचं काही होईल. जास्त घेतल्यामुळे त्यांना विसरल्यासारखं होत असेल. ते एकतर हॉस्पिटलमध्ये राहतात नाहीत, तर बाहेर राहतात. कोणी अरे म्हटले तर कारे होणारच आहे. छगन भुजबळ असल्या कोल्हे-कुईला दाद देत नाही, त्यांच्या जन्मापासून हा भुजबळ निवडणूक लढवतो आहे असा पलटवारही त्यांनी यावेळी केला.(Manoj Jarange Patil)
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंनी जरांगेंनी यांनी बीडमधील जाहीर सभेत भुजबळांवर टीकेची झोड उठवली होती. आधीच चांगले वागले असते तर बरं झाले असते. आता ते मला जरांगे साहेब म्हणत आहेत, आरक्षण मिळू देत मी त्यांना कचकाच दाखवतो, असा इशारा त्यांनी दिला. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलले तर त्याला सोडणार नाही. भुजबळांना कुणी मंत्री कोण? असा सवाल त्यांनी केला. शांतताप्रिय मराठ्यावर सरकारने खोटा डाग लावला, असा आरोप जरांगे-पाटलांनी सरकारने अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्ज घटनेचा समाचार घेतला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.