प्रकाश लिमये
Pratap Sarnaik News : भाजपचे मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन क्लब मध्ये आयोजित पूल पार्टीवरून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व नरेंद्र मेहता पुन्हा आमने सामने आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण पाणीटंचाईच्या दाहकतेने होरपळत असताना जनतेच्या हक्काच्या पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या अशा 'ओल्या पार्ट्या' हाणून पाडा, असे आदेश सरनाईक यांनी दिले आहेत. मात्र पावसाचा पत्ता नासल्याने ही पूल पार्टी शुक्रवारीच (ता.१९) रद्द करण्यात आली असून सरनाईक त्यावरून निव्वळ राजकारण करण्यात असल्याचे प्रत्युत्तर नरेंद्र मेहता यांनी दिले आहे.
मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन क्लबमध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून येत्या २७ जूनला पूल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. समाजमाध्यमांवर त्याची जोरदार जाहिरात करण्यात आली होती. या कार्यक्रमावरून प्रताप सरनाईक यांनी मेहता यांना लक्ष्य केले आहे.
राज्यात नद्या, धरणे आणि तलाव कोरडे ठाक पडले असून, राज्यातील बळीराजा आणि सामान्य जनता चातकासारखी आभाळाकडे डोळे लावून बसली आहे. मीरा-भाईंदर शहराची स्थिती तर अत्यंत भयावह आणि संतापजनक आहे. शहरात दोन-दोन दिवस पाण्याचा पत्ता नसतो, आणि आलेच तर ते साठवण्यापूर्वीच गायब होते.अशा परिस्थितीत मिरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता हे मात्र सत्तेच्या नशेत आणि पैशाच्या घमेंडीत धुंद होऊन सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, अशी टीका सरनाईकांनी केली.
ते म्हणाले, २७ जूनला आमदारांच्या मालकीच्या '७/११ क्लब'मध्ये एका बीभस्त आणि अश्लील पूल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शहर कोरडे पडलेले असताना, हजारो लिटर पाण्याचा अपव्यय करून ही पूल पार्टी साजरी करण्याचा निर्लज्जपणा हे मस्तवालपणाचे लक्षण आहे. ही पूल पार्टी उधळून लावा असे आदेश सरनाईक यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.
नरेंद्र मेहता यांनी देखील या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून दोन महिन्यापूर्वीच या पूल पार्टीचे आयोजन केले होते. त्यात रेन डान्सचा देखील समावेश होता. मात्र पावसाअभावी राज्यात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन ही पार्टी याआधीच रद्द करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवरून कार्यक्रमाच्या सर्व जाहिराती हटविण्यात आल्या आहेत. मात्र त्याची माहिती न घेता केवळ राजकारण करण्यासाठीच सरनाईक आरोप करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.