विरार : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीतही राज्यसभेप्रमाणेच मोठी चुरस आहे. महाविकास आघाडी आणि भाजपला एक जागेसाठी मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यासाठी छोटे पक्ष आणि अपक्षांना हातीशी धरणं गरजेचं आहे. पण राज्यसभेच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावलेल्या बहुजन विकास आघाडीने सर्वच पक्षांना धक्का दिला आहे. (Hitendra Thakur Latest Marathi News)
बविआची तीन मतं असून ही मतं असून ती ज्या पक्षाला मिळतील, त्यांचा विजय सुकर असल्याचे मानले जात आहे. पण आता त्यांच्या तीनपैकी एका मताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आघाडीतील नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर हे अचानक कौटुंबिक कामासाठी न्युयॉर्कला गेले आहेत. विधान परिषदेची निवडणूक 20 तारखेला आहे. त्यामुळे तोपर्यंत ते परत येणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
क्षितीज ठाकूर देशाबाहेर गेल्याने एका मताचा प्रश्नचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यसभा निवडणूकीनंतर विधान परिषदेसाठी बविआचा हा नवा डाव आहे का ? असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करू लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत बविआने आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले. पक्षाचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आताही आपले पत्ते खुले केलेले नाहीत.
काँग्रेचे उमेदवार भाई जगताप यांच्या नंतर बुधवारी भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर यांनी दोघांनाही कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यातच हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा आणि आमदार क्षितीज ठाकूर हे विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर न्युयॉर्कला गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. क्षितिज ठाकूर हे निवडणुकीच्या मतदानाला येणार का? या एका मताचा फटका कोणाला बसणार? यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
याबाबत बहुजन विकास आघाडीच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले की, क्षितिज ठाकूर हे कामासाठी गेले आहेत. परंतु ते निवडणुकीच्या दिवशी मतदानाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावर कोणी राजकारण करू नये. तर याच मुद्यावर हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.