
Mumbai News : मुंबई -गोवा महामार्गाचे दीर्घ काळापासून रखडलेले काम यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता अधिक आक्रमक पवित्रा घेणार आहे. पनवेल येथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावर कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या महामार्गावर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले. आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई गोवा महामार्गावर मनसेची पदयात्रा आंदोलन होणार आहे. (Latest Marathi News)
मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नासाठी मनसेने पदयात्रेचे आयोजन केले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेचं आयोजन केले जाणार आहे. राज्यभरातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था जनता आणि राज्य सरकारसमोर मांडले जाणार आहे.
नुकत्याच पनवेल इथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नासाठी विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे यावर आंदोलन केले होते. महागार्माचं कामकाज पाहणाऱ्या कार्यालयाची तोडफोड मनसेने केली होती. यानंतर आता या पदयात्रेचे आयोजन केले गेले आहे.
याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, 'राज्यभरात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. राज्यातलं कोणतेही शहर घ्या, प्रत्येक ठिकाणी खड्ड्यांचा हा गंभीर प्रश्न आहे. रस्त्यांच्या कामामध्ये दिरंगाई झाली. मोठा भ्रष्टाचार झाला, या रस्त्यांवर अनेक नागरिकांचे मृत्यू झाले. समृद्धीवर झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाते, मात्र कोकण मार्गांवर का दिली जात नाही? असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला.
कशी असेल मनसेची पदयात्रा -
मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढली जाणार आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये ही पदयात्रा मार्गस्थ होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ही यात्रा पायी चालत असेल आणि तिसऱ्या टप्प्यात गाव जनजागृती अभियान मनसेच्या वतीने राबविण्यात येईल. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या पदयात्रेचे नियोजन आहे. लोकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावं, असं मनसेच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे. २३ ॲागस्टपासून या यात्रेला सुरूवात होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.