Mumbai News, 31 Aug : राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता सहकार क्षेत्रातील एका महत्त्वाच्या निवडणुकीवरून थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. मुंबै मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मुंबै बँकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबै बँकेची निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता असून, शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यासाठी तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. ठाणे जिल्हा बँकेत शिंदे गटाने स्वबळावर पाच जागा जिंकल्या होत्या. या निकालानंतर आता शिवसेनेने आपला मोर्चा मुंबै बँकेकडे वळवल्याचं दिसत आहे.
मुंबै बँकेवर सध्या भाजपचं वर्चस्व आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाणारे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचा मुंबै बँकेच्या राजकारणात महत्त्वाचा प्रभाव आहे. 2021 मध्ये झालेल्या मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे मुंबै बँक ही भाजपची मजबूत पकड असलेली संस्था मानली जाते.
अशा परिस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबै बँकेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय घेतल्यास भाजपच्या वर्चस्वाला थेट आव्हान निर्माण होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रातील निवडणूक न राहता भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय ताकदीची चाचणी ठरण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, राज्यात महायुतीच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेत आहेत. मात्र सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र राजकीय ताकद आजमावताना दिसत आहेत. ठाणे जिल्हा बँकेनंतर आता मुंबै बँकेची निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीत भाजपच्या पॅनलविरोधात शिंदे सेनेचा पॅनल उतरल्यास महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्षच आमनेसामने येतील.
मुंबै बँकेचं महत्त्वही मोठं आहे. सहकार क्षेत्रात या बँकेची मोठी आर्थिक उलाढाल आहे. विविध गृहनिर्माण संस्थांना कर्जपुरवठा करण्यासह सहकार क्षेत्राशी संबंधित अनेक आर्थिक व्यवहार मुंबै बँकेच्या माध्यमातून होतात. त्यामुळे या बँकेवर नियंत्रण मिळवणं हे राजकीय आणि सहकार क्षेत्रातील प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जातं.
शिवसेनेने मुंबै बँकेच्या निवडणुकीत ताकद लावल्यास भाजपसमोर आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचं आव्हान असेल. दुसरीकडे ठाणे जिल्हा बँकेतील निकालानंतर वाढलेला आत्मविश्वास आणि सहकार क्षेत्रातील आपली ताकद दाखवण्यासाठी शिंदे सेनेसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरू शकते.
त्यामुळे आगामी काळात मुंबै बँकेच्या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाकडून कोणतं पॅनल उभं केलं जातं, कोणत्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेना किती ताकद लावते, याकडे सहकार आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मुंबै बँकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने आल्यास ही लढत महायुतीच्या अंतर्गत राजकारणासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.