
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जवळीक ही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठे राजकीय समीकरण घडवणारी घटना ठरू शकते.
ठाकरे बंधूंची युती झाली तर मराठी मत एकवटून भाजप-शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
शिंदे-आनंदराज आंबेडकर युती आणि दहीहंडी उत्सवातील राजकीय शक्तिप्रदर्शनामुळे निवडणुकीतील लढत अधिक रंगणार आहे.
मातोश्री’वर ३१ जुलैला घडलेली भेट केवळ एक भावनिक क्षण नव्हता तर आगामी राजकीय समीकरणांची पायाभरणी होती. याच पार्श्वभूमीवर दहीहंडी, गणेशोत्सवासह अन्य सार्वजनिक सणांची रणनीती आता नव्याने आखली जात आहे.
कोण कुणाच्या सोबत? कोणाचा तडाखा कोठे बसणार? भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांना हीच चिंता सतावत आहे. हे केवळ निवडणुकीचे वर्ष नसून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र? राजकीय विश्लेषक सुमित म्हसकर यांच्या मते ही भेट म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारच्या दिलेले आव्हान आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या मते हे फक्त भावनिक नाही तर युतीचा स्पष्ट संकेत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये सत्तांतर घडू शकते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे.
ही निवडणूक केवळ महापालिका निवडणूक नसून, महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र येण्याची शक्यता ही शिंदेंची शिवसेना आणि भाजप युतीच्या म्हणजेच फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकते. कारण भाजपचा कट्टर विरोधक असलेला मतदारवर्ग आता एकत्र येऊ पाहणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये एक ‘मूल्यनिष्ठ पर्याय’ पाहू लागेल.
हे वास्तव आहे की दोघांमधील संबंध भावनिकदृष्ट्या दृढ आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा, शिवसेनेचा इतिहास आणि मराठी अस्मिता या तिघांचा संयोग आहे. मात्र, राजकारणात भावना ही रणनीतीची सुरुवात असते शेवट नव्हे. राज ठाकरे यांनी हा भावनिक क्षण वापरून स्वतःचे राजकीय पटलावरील पुनरागमन जोरात घडवून आणले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठीही हा पर्याय काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या मर्यादांतून बाहेर पडण्याची संधी आहे.
ठाकरे बंधूंची ही भेट ही एक सुरुवात वाटते. एकत्र येण्याचे अनेक धोरणात्मक, भावनिक आणि सामाजिक फायदे आहेत. जर ही युती खरोखर साकारली तर मराठी मतांची नवीन मांडणी होईल. मुंबई महापालिकेचा राजकीय नकाशा बदलू शकतो अन् भाजप-शिंदे युतीला जोरदार आव्हान उभं राहू शकतं. राजकारणात काहीही अंतिम नसतं. पण ही भेट मराठी अस्मिता पुन्हा एकत्र उभी करण्याची अंतिम संधी असू शकते.
महापालिका जवळ येत असताना ठाकरे बंधूंची जवळीक शिंदे गटासाठी धोकादायक ठरू शकते. उद्धव ठाकरेंकडे शिवसैनिकांचे पाठबळ, तर राज ठाकरेंकडे तरुण मराठी मतदार आहेत. ही युती मुंबईतील ४० टक्के मराठी मत एकवटू शकते. दादर, परळ, चेंबूरसारख्या भागांमध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘खरी शिवसेना कोणती?’ हा प्रश्न निवडणुकीत पुन्हा ऐरणीवर येईल. उद्धव-राज ठाकरे एकत्र आले तर त्यांचं ‘बाळासाहेबांचा खरा वारसा फक्त आहोत,’ अशा भावनिक लाटेचा फायदा या जोडीला होण्याची शक्यता आहे. याउलट शिंदे गटाकडे तितकी भावनिक आपुलकी किंवा पारंपरिक वजन नाही.
शिंदेंची शिवसेना, भाजप, मनसे हे सर्व पक्ष हिंदुत्वावर दावा करत आले आहेत. मात्र राज ठाकरे आधीपासून आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेत आहेत. उद्धव ठाकरेही सध्या पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर हिंदुत्वाचे एक नवे शक्तिकेंद्र निर्माण होईल. भाजप-शिंदे युतीला यामुळे मोठा फटका बसू शकतो. महापालिकेतील बरेचसे नगरसेवक सत्ता पाहून शिंदे गटात गेले. पण ठाकरे बंधू एकत्र आले तर या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल.
काही जण ‘मूळ शिवसेने’कडे वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत सापडू शकते. भाजप-शिंदेंच्या शिवसेना युतीमुळेच मागच्या वेळी मुंबईतील महापालिकेवर दावा केला गेला होता. पण ठाकरे बंधूंच्या युतीने भाजपचंही गणित ढासळू शकतं. भाजपला मराठीबहुल वॉर्डांत फटका बसू शकतो अन् त्यांच्या मराठी मतदारांचा टक्का कमी होऊ शकतो.
या युतीनंतर ‘ठाकरे ब्रँड’ तयार झाला तर त्याचा जोरदार प्रचार होईल. ‘मराठी अस्मिता’, ‘हिंदुत्व’ आणि ‘गद्दारी’ या त्रिसूत्रीवर लढाई खेळली जाईल. समाजमाध्यमांपासून गल्लोगल्लीत हा ‘ब्रँड’ पोहोचवला जाईल त्याला फार मोठा भावनिक पाठिंबा मिळू शकेल. ही फक्त मुंबई महापालिकेपुरती मर्यादित लढाई नाही. ‘ठाकरे विरुद्ध गद्दार’ ही प्रतिमा २०२९ पर्यंत मजबूत होऊ शकते. जयंत माईणकर यांनी सांगितले, की ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेंना मोठा फटका बसेल. हेमंत देसाईंच्या मते ही युती शिंदे गट आणि भाजपला अडचणीत टाकेल. म्हणजेच ठाकरे बंधूंची युती ही महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण घडवू शकते.
उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांच्या पारंपरिक शिवसैनिकांची सहानुभूती आणि मतदारांचा विश्वास आहे. राज ठाकरेंचा प्रभाव मराठी युवकांमध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक हिंदुत्वावर ठाम विश्वास असणाऱ्या मतदारांमध्ये आहे. हा संगम झाला तर मुंबईतील मराठी मते ठाकरेंच्या बाजूला खेचली जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गट यांनी गेल्या निवडणुकांपासून हिंदुत्वाचा अजेंडा पेलला आहे. पण राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा मानले जातात. दुसरीकडे उद्धव ठाकरे हळूहळू पुन्हा हिंदुत्वाकडे झुकताना दिसत आहेत.जर दोघांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र मोहीम सुरू केली तर भाजप-शिंदे यांचा ‘एकाधिकार’ संपेल. विशेषतः मुंबईतील मराठीबहुल विभागांत हे अत्यंत परिणामकारक ठरू शकते.
उद्धव-राज युतीमुळे भाजपच्याही गणितांना तडा जाऊ शकतो. भाजपला मराठीबहुल प्रभागांत जागावाटप करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. भाजपचा पारंपरिक हिंदीभाषिक मतदार हा ठाकरेंच्या भावनिक मोहिमेने प्रभावित होण्याची शक्यता आहे. राज-उद्धव भेट सध्या तरी भावनिक आणि कौटुंबिक वाटते, पण ‘आगामी काळ चांगलाच’ हे उद्धव ठाकरेंचे वक्तव्य सहजपणे केलेले नाही. ही भेट भावनेपलीकडची राजकीय नांदी ठरू शकते. जर युती झाली तर शिंदे गटाला धक्का आणि भाजपला नवी रणनीती आखावी लागेल. ही खरी एकजूट ठरेल की क्षणिक भावना याचं उत्तर महापालिका निवडणुकीत मिळेल.
मुंबई महापालिका, ठाणे, पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी केलेली युती राजकीय वर्तुळात एक वेगळे वळण घेताना दिसत आहे. ह्या युतीमागे सामाजिक समावेशकतेचे भान आहे, की भाजपसह इतर घटक पक्षांवर राजकीय दबाव निर्माण करण्याचा डाव, हे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
एकनाथ शिंदे हे सध्या भाजपच्या राजकीय संरक्षकत्वाखाली आहेत, हे वास्तव असूनही त्यांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करावे लागणार आहे. भाजप मुंबई ताब्यात घेण्यासाठी सज्ज असून, त्यांना ठोस मतपेढी अपेक्षित आहे. मात्र, शिंदेंकडे ठाकरेंसारखं निष्ठावान ‘मराठी मतदारसंघ’ नाहीत. तसेच मनसेप्रमाणे आक्रमक मराठी ‘ब्रँड’ही नाही. त्यामुळे दलित मतदारांना साधण्यासाठी त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रुपाने एक ‘वैकल्पिक ताकद’ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. रिपब्लिकन सेनेचा राजकीय प्रभाव अत्यंत मर्यादित आहे. २०१९ पासून त्यांच्या कोणत्याही उमेदवाराला विधानसभेत किंवा लोकसभेत स्थान मिळालेले नाही.
पक्षाची संघटनरचना सैल आहे अन् आंबेडकर कुटुंबात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचेच जास्त प्रभावी स्थान आहे. त्यामुळे ही युती ही निव्वळ प्रतिकात्मक पातळीवर मर्यादित ठरण्याची शक्यता अधिक आहे. राजकीय युती म्हणजे निवडणुकीपूर्वीचा डाव. पण कोणतीही युती यशस्वी ठरते की अयशस्वी हे निवडणुकीनंतरच्या आकड्यांवरच ठरते. शिंदे-आंबेडकर युती केवळ ‘मिडिया मॅनेजमेंट’ आणि राजकीय दबावासाठी असेल तर ती फार काळ टिकणार नाही. आगामी निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. युती-आघाड्या हे राजकीय खेळाचे भाग आहेत. मात्र, मतदार प्रतिमेपेक्षा कामगिरी आणि संघटनशक्तीवर मतदान करतो. त्यामुळे शिंदे-आंबेडकर युतीने किती मते मिळवली, हे २०२५ च्या महापालिका निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
मुंबईत दहीहंडीचा उत्सव म्हणजे उत्साह, परंपरा आणि थरारक स्पर्धांचा एक भव्य जल्लोष. मात्र यंदा या उत्सवात राजकीय शक्तिप्रदर्शन होत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्याने हा आता केवळ उत्सव राहिलेला नाही, तर राजकीय पक्षांना त्यात मतपेढी दिसत आहे. राजकीय हंड्या उभारण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मुंबईच्या चौकां-चौकांत लाखोंच्या बक्षिसांची घोषणा करणारे फलक झळकू लागले आहेत. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशासोबत आता डीजे, बॉलिवूड कलाकारांचे आकर्षण आणि थरांची तयारीमुळे दहीहंडीचा उत्सव म्हणजे एक ‘भव्य राजकीय शो’ बनला आहे.
बक्षिसांच्या मोठमोठ्या रकमा, भव्य फलक, कलावंतांची उपस्थिती, थरांचे थर, सराव शिबिरांच्या माध्यमातून राजकीय पक्ष मतपेढीवर डोळा ठेवून ढोल पिटत आहेत. उत्सव कोणाचाही असो पण सध्या तो राजकीय रंगांनी रंगवला गेला आहे हे नक्की. गोविंदांच्या थरांइतकीच निवडणुकीची तयारीचे थरांवर थर रचले जात आहेत. दहीहंडीचा जल्लोष जितका मोठा, तितकी राजकीय आकांक्षा प्रबळ! या लाखोंच्या हंड्यांतून कोणता पक्ष मतदारांच्या मनाची हंडी जिंकतो, हे आता पहायला हवे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.