

Mira Bhayandar Municipal Corporation : मिरा-भाईंदर महापालिकेच्या लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात पुन्हा एकदा राजकीय वाद पेटला आहे.
नाट्यगृहाच्या देखभालीसाठी महापालिकेकडे निधी नाही का आणि नाट्यगृहातून मिळणारे उत्पन्न नेमके कुठे जाते, असा सवाल सरनाईक यांनी केला. त्यावर मेहता यांनी सरनाईकांच्या दाव्याला आव्हान देत थेट राजीनाम्याचे चॅलेंज दिले.
मिरा-भाईंदर येथील लता मंगेशकर नाट्यगृहात एका कार्यक्रमासाठी सरनाईक उपस्थित होते. यावेळी नाट्यगृहातील मूलभूत सुविधांची झालेली दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी नाट्यगृहाच्या देखभालीवरून नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासन (Municipal Corporation) आणि स्थानिक राजकीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले.
शिवसेनेचे सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दावा केला की, लता मंगेशकर नाट्यगृह उभारण्यासाठी 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून, त्यासाठी महापालिकेचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. एवढा खर्च करून उभारलेल्या नाट्यगृहाची अशी अवस्था का झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नाट्यगृहाच्या देखभालीसाठी महापालिकेकडे निधी नाही का? नाट्यगृहाचे उत्पन्न कुठे जाते? असा प्रश्न उपस्थित करत सरनाईक यांनी मेहता यांच्यावर निशाणा साधला. तसेच नाट्यगृहाच्या देखभालीसाठी आपण स्वतः 100 रुपयांची मनीऑर्डर करतो, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
सरनाईकांच्या या आरोपांना नरेंद्र मेहता यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. नाट्यगृहातून वार्षिक 10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, हे सरनाईक यांनी सिद्ध करावे, असे आव्हान मेहता यांनी दिले. नाट्यगृहातून 10 कोटी रुपयांचे उत्पन्न होते, हे सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन आणि महापौरही राजीनामा देतील. मात्र, हे सिद्ध झाले नाही तर सरनाईक यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान मेहता यांनी दिले.
मेहता यांनी सरनाईकांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. तसेच सरनाईक यांनी चुकीचा दावा केला असल्यास त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली. नाट्यगृहाच्या देखभालीसाठी योग्य व्यक्ती शोधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगताना, तुम्ही आणि माजी आयुक्त ढोले यांनी उल्हासनगरचा एसी लावला की, चायनाचा लावला हे पहिले चिंतन करा, असा खोचक टोला मेहता यांनी लगावला.
नाट्यगृहाच्या देखभालीसाठी आपण व्यक्ती शोधत आहोत. योगायोगाने आमचा निर्णय झाला आणि लगेचच हा प्रकार घडला, असे ते म्हणाले. दरम्यान, प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यातील राजकीय संघर्ष मिरा-भाईंदरच्या राजकारणात चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा वाद आगामी काळात आणखी रंगण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.