

मुंबई महापालिकेतील सत्तेचे गणित आता अंतिम टप्प्यात आले असून महायुतीमध्ये ‘फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्युल्यावर चर्चा रंगली आहे. प्रमुख समित्यांचे वाटप कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारपूर्वी यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान झाल्यानंतर आता महापालिकेतील महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदावरून दोन्ही पक्षांमध्ये सलग बैठका सुरू आहेत. स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि बेस्ट समिती या चार वैधानिक समित्यांपैकी कोणती समिती कोणाकडे जाईल, यावर अंतिम तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सध्या चर्चेत असलेल्या सूत्रानुसार स्थायी समिती भाजपाकडे राहण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक निर्णय, मोठे प्रकल्प आणि खर्चाला मंजुरी देण्याचे अधिकार या समितीकडे असल्यामुळे तिचे महत्त्व मोठे मानले जाते. त्यामुळे ही समिती सोडण्यास भाजपाने सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर शिवसेनेने सुधार समिती आपल्या वाट्याला देण्याचा आग्रह धरला.
सुधार समितीच्या सदस्यसंख्येवरूनही राजकीय समीकरण बदलले आहे. सुरुवातीला या समितीत महायुती आणि विरोधकांची संख्या समान राहणार होती. त्यामुळे अध्यक्षपद चिठ्ठीद्वारे ठरण्याची शक्यता होती. मात्र शिवसेनेने रणनीती आखत काही नगरसेवकांना आपल्या गटात सामील करून घेतले. यामुळे सुधार समितीत महायुतीचे संख्याबळ 1 ने वाढले आहे. या बदलामुळे सुधार समिती शिवसेनेकडे देण्यास भाजपानेही सकारात्मक भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शिक्षण समिती आणि बेस्ट समितीबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. शिक्षण समिती भाजपाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर बेस्ट समिती शिवसेनेला देण्यावर चर्चा सुरू आहे. याशिवाय 6 विशेष समित्यांपैकी 4 समित्या भाजपाकडे आणि 2 समित्या शिवसेनेकडे ठेवण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सत्तेचा समतोल राखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
या सर्व घडामोडींमध्ये अंतिम निर्णयासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच समित्यांचे वाटप अधिकृतरीत्या जाहीर केले जाणार आहे. समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवार 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे त्याआधीच सर्व नावे निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. 18 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर होतील, अशी माहिती महायुतीतील सूत्रांकडून दिली जात आहे.
एकूणच, महापालिकेतील सत्ता वाटपात दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीचा मार्ग स्वीकारला जात असून ‘फिफ्टी-फिफ्टी’चा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंगळवारपूर्वी अंतिम निर्णय जाहीर झाल्यास महापालिकेतील राजकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.