Mumbai North East LokSabha Constituency : ठाकरे गटाची तोफ लोकसभेत धडाडणार; ईशान्य मुंबईतून संजय राऊतांना उमेदवारी?

Shiv sena MP Sanjay Raut profile in Marathi : शिवसेना फुटल्यानंतर आता ठाकरे गटाने पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करून आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय
Mumbai North East Lok Sabha Constituency :
Mumbai North East Lok Sabha Constituency :Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : राज्यात महाविकास आघाडी (MVA)सरकारच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत राज्यातील सर्वाधिक चर्तेत राहिलेले राजकारणी म्हणजे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत. शिवसेनेची बुलंद तोफ, निर्भीड पत्रकार आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देशभरात प्रसिद्ध आहेत. आपल्या धारधार लेखनशैलीने विरोधकांना नामोहरम करण्यात राऊत यांचा जितका हातखंडा आहे, तितकाच हातखंडा आपल्या हजरजबाबी वक्तृत्वातून पक्षाची रोखठोक भूमिका मांडण्यातही आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात राऊत यांची जडणघडण झाली. क्राईम रिपोर्टर ते शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकाचे कार्यकारी संपादक असा संजय राऊत यांचा पत्रकारितेतील प्रवास आहे. ठाकरी बाण्याला शोभेल, अशी लेखनशैली असलेल्या राऊत यांना शिवसेनेने 2004 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिली होती. त्यानंतर आजतागायत सलग चार टर्म ते राज्यसभेचे खासदार आहेत. Shivsena MP Sanjay Raut profile in Marathi

Mumbai North East Lok Sabha Constituency :
Thackeray VS BJP : भाजप-ठाकरे राजकीय युद्धात कारसेवक बजावणार महत्त्वाची भूमिका

संजय राऊत हे एक फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेना -भाजप युती असो किंवा महाविकास आघाडी, संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका रोखठोकपणे मांडली आहे. त्यामुळे राजकारणात शिवसेना नावाचा दरारा निर्माण करण्यात संजय राऊत यांचाही वाटा तितकाच मानला जातो. संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. विरोधकांना थेट अंगावर घेणारे संजय राऊत युतीमधील घटक पक्षांनाही सुनावण्यात मागे-पुढे पाहत नाहीत. थोडक्यात जेथे उद्धव ठाकरे स्पष्टपणे आपली भूमिका मांडू शकत नाहीत, तेथे संजय राऊत सामनाच्या माध्यमातून अथवा पत्रकार परिषेदतून पक्षाची भूमिका मांडताना दिसून येतात. या माध्यमातून संजय राऊत यांनी भाजपला कित्येक वेळा थेट अंगावर घेतले आहे. यातून झालेल्या राजकीय डावपेचातून त्यांना कारागृहातही जावे लागले होते. त्यामुळेच संजय राऊत यांचे ठाकरे गटात एक महत्त्वाचे स्थान आहे. LokSabha Election 2024

Mumbai North East Lok Sabha Constituency :
Ed Enquiry Of Sandeep Raut : ईडीकडून परिवार टार्गेट, संजय राऊत कडाडले

अन्य पक्षांतील वरिष्ठ नेत्यांसोबत असलेली मैत्री आणि पक्षाची बुलंद तोफ या गुणवैशिष्ट्यांमुळे संजय राऊत यांची क्रेझ निर्माण झाली आहे. त्यांना मानणारा एक विचारप्रवाह आहे. शिवसैनिकांना चेतवण्याचे कसब संजय राऊत यांच्याकडे आहे. त्यामुळे कदाचित शिवसेनेच्या ठाकरे गटाने संजय राऊत यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला असावा. असे असले तरी संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेतून होणाऱ्या बोचऱ्या टीका, कोणत्याही नेत्यांचा मुलाहिजा न ठेवणे यामुळेच शिवसेनेचे नुकसान झाल्याचाही आरोप बऱ्याच वेळा झाला आहे.

दरम्यान, 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर आता ठाकरे गटाने पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करून आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मातोश्रीवरील नेतृत्वाने राज्यसभेच्या उमेदवारांना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्याची तयारी केली आहे. यामध्ये खासदार अनिल देसाई यांच्यासह शिवसेनानेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनाही मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य मुंबई) या मतदारंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सध्या भाजपचे मनोज कोटक हे विद्यमान खासदार आहेत. इशान्य मुंबई हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने संजय राऊत यांना उमेदवारी दिल्यास आपणही निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी तयार असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती.

Mumbai North East Lok Sabha Constituency :
Sanjay Raut : बबनराव घोलप कुठे गेले ? संजय राऊत म्हणाले…

ठाकरे गट सध्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. त्यामुळे ईशान्य मुंबई हा मतदारसंघ कोणाला सुटणार, हे निश्चित नाही. दरम्यान, गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने संजय पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली होती. त्यातच आता संजय पाटील शरद पवार गटात नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेकडून संजय राऊत यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत या मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपचे, दोन मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आहेत. यामध्ये विक्रोळीमधून संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे आमदार आहेत. भांडूप पश्चिम मतदारसंघातून रमेश कोरगावकर शिवसेना आमदार आहेत. अन्य एक मतदारसंघ समाजवादी पक्षाकडे आहे.

नाव (Name)

संजय राजाराम राऊत

जन्मतारीख (Birth date)

15 नोब्हेंबर 1961

शिक्षण (Education)

बी. कॉम.

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

अलिबागमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले राऊत यांच्या वडिलांचे नाव राजाराम राऊत आणि मातोश्रींचे नाव सविता राजाराम राऊत असे आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हेदेखील राजकारणात सक्रिय असून ते मुलुंडचे आमदार आहेत. संजय राऊत यांच्या पत्नीचे नाव वर्षा राऊत असे आहे. त्यांना पूर्वशी आणि विधिता या दोन मुली आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

कार्यकारी संपादक, सामना

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य मुंबई)

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

Mumbai North East Lok Sabha Constituency :
Shiv Sena News : शिवसेना शिंदेंची... पण शिवसैनिक कुणाचे?

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

शिवसेना नेते संजय राऊत हे बालपणापासूनच शिवसेनेच्या विचारांनी प्रभावित झालेले होते. त्यांचे वडील राजाराम राऊत हे कामगार सेनेत सक्रिय होते. त्यामुळे संजय राऊत यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांच्यानिमित्ताने शिवसेनेशी जवळीक वाढली होती. मात्र, सुरुवातीला संजय राऊत यांनी आपल्या करिअरची सुरुवात क्राइम रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर लोकप्रभामध्ये काम करीत असताना राज ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांचा शिवसेनेशी निकटचा संपर्क आला. पुढे 1992 मध्ये त्यांनी सामनामध्ये कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. सामनातून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे शिवसेनेची भूमिका मांडली. तसेच सक्रिय राजकारणात संजय राऊत यांनी शिवसेनेचा उत्कर्षही पाहिला आहे आणि पडता काळही पाहत आहेत. पडत्या काळातही ते निष्ठेने ठाकरे गटासोबत आहेत. 'सामना'चे संपादक म्हणून काम पाहत असताना त्यांनी पक्ष संघटन, निवडणुका, प्रचारसभा दौरे इत्यादी जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.

राऊत यांना पक्षाने 2004 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिली. 2005 मध्ये त्यांना शिवसेना नेते म्हणून पदभार देण्यात आला. पक्षनेते म्हणून त्यांनी केंद्र आणि राज्यात शिवसेना- भाजप युतीमध्ये शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडली. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतरही संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने पक्षाचे काम केले. पुढे 2019 मध्ये शिवसेनेने भाजपसोबत असलेली 25 वर्षांची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. शिवसेना एक कट्टर हिंदूत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जात असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात शिवसेनेकडून संजय राऊत यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी पक्षनेते म्हणून पक्षाची आक्रमक भूमिका मांडली. हे करीत असताना त्यांनी भाजपला थेट अंगावर घेतले. त्याचाच परिणाम म्हणून संजय राऊत यांना एका प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर 103 दिवस तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना पक्ष फोडला. पुढे भाजपशी हातमिळवणी करून सत्ताही स्थापन केली. संजय राऊत यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाशी निष्ठा राखत आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला आहे. दरम्यान, शिवसेनाफुटीपूर्वीच संजय राऊत हे चौथ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेले आहेत. आता ठाकरे गटाकडून संजय राऊत यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Mumbai North East Lok Sabha Constituency :
Sanjay Raut News : ''पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपीने हार घातल्याने पुतळा अपवित्र झाला; म्हणून आम्ही अभिषेक केला...''

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

संजय राऊत यांनी लोकोपयोगी कामांसाठी मदत केली आहे. गरजूंसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांनाही ते मदत करण्यासाठी तत्पर असतात.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

संजय राऊत यांनी 2019 ची निवडणूक लढवली नव्हती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) :

निवडणूक लढवली नव्हती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

संजय राऊत हे लोकप्रतिनिधी म्हणून कोण्या एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. मात्र ते राजकारणातील एक वलयांकित चेहरा म्हणून ओळखले जातात. 'सामना'चे कार्यकारी संपादक, पत्रकार, शिवसेना नेते, महाविकास आघाडीचे सूत्रधार आणि एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ते परिचित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मतदार संजय राऊत यांना ओळखतो. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क तितकाच प्रभावी मानला जातो.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

संजय राऊत हे राजकारणी म्हणून तर प्रसिद्ध आहेतच, मात्र त्यांची ओळख ही एक पत्रकार, संपादक म्हणून जास्त आहे. त्यामुळे ते सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करताना दिसून येतात. पक्षाचे प्रवक्ते म्हणून ते सातत्याने आक्रमकपणे आपली भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतात. याशिवाय माध्यमांना त्यांनी दिलेल्या मुलाखती, काही वक्तव्ये हेदेखील ते सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसून येतात. समाजातील उपेक्षित घटकांवर कोठे अन्याय, अत्याचार होत असेल, तर त्याबाबतही ते आपली भूमिका ट्विटर, फेसबुकवरून मांडताना दिसून येतात. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या वक्तव्यांची पुढच्या काही क्षणातच माध्यमे दखल घेतात, इतका ते सोशल मीडियाचा प्रभावी वापर आपली मते व्यक्त करण्यासाठी करतात.

Mumbai North East Lok Sabha Constituency :
Sanjay Raut : 'मोदी फक्त दोघांना घाबरतात, एक शेतकरी अन् दुसरे ठाकरे'; संजय राऊतांचा हल्लाबोल

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

संजय राऊत हे शिवसेना नेते, राज्यसभा सदस्य, संपादक आणि एक कडवे शैवसैनिक आहेत. त्यांची लेखणी जितकी धारदार आहे, तितकीच स्फोटक त्यांची वक्तव्ये आहेत. वक्तव्यांमुळे आणि लिखाणामुळे संजय राऊत राष्ट्रीयच काय आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील प्रसिद्ध आहेत. संजय राऊत यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असताना अनेक महत्त्वाची विधाने केली आहेत. कित्येकदा ती विधाने वादग्रस्तही ठरली आहेत, तर काही विधाने विरोधकांना निरुत्तर करणारी ठरली आहेत. संजय राऊत हे शिवसेनेची भूमिका मांडत असताना जहाल भाषेचा वापर करताना दिसून येतात. त्यांची भूमिका रोखठोक असते, मात्र ती कधी कधी वादग्रस्त ठरते.

संजय राऊत यांनी केलेल्या विधानांमुळे अनेक वेळा राज्यात गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात महायुती अस्तित्वात असताना जानेवारी 2020 मध्ये संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांनी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन करीम यांची भेट घेतल्याचे विधान केले होते. त्यानंतर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला होता. तसेच संजय राऊत यांनी छत्रपती उदयनाराजे भोसले यांच्यावर टीका करताना छत्रपतींच्या वंशजांनी ते छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, अशी टीका केली होती. त्यावरून राज्यात मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनाफुटीनंतर जे आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यांच्याबाबत अनेक वेळा त्यांनी वादग्रस्त विधाने केली होती. आम्ही चाळीस रेडे कामाख्यादेवीला बळी द्यायला पाठवले असल्याचेही विधान केले होते. त्यानंतर त्यांनी विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याची टीका केली होती. याखेरीज संजय राऊत यांनी ईडी, सीबीआय या केंद्र सरकारच्या घरचे घरगडी असल्याची टीका केली होती. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवेळी निवडणूक आयोगावरही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. अलिकडेच संजय राऊत यांचे एक वादग्रस्त ट्विट आंतराराष्ट्रीय स्तरावर चर्तेत आले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी इस्त्रायलने गाझा पट्टीत एका रुग्णालयास घेरलेल्या मुद्द्यावर भाष्य करताना हिटलर ज्यूंचा इतका द्वेष का करायचा हे समजलं का? असे मत व्यक्त केले होते. त्यावरून इस्त्रालयाच्या भारतीय दूतावासाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी आपले ट्विट डीलीट केले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

आक्रमक आणि प्रभावी वक्तृत्व, धारदार लेखनशैली, इतर पक्षांतील नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध आणि जागतिक राजकारणाची माहिती या गोष्टी संजय राऊत यांच्यासाठी सकारात्मक बाजू मानल्या जातात. संजय राऊत यांनी शिवसेनेचा उत्कर्ष आणि पडता काळ या दोन्ही बाजू अगदी जवळून पाहिल्या आहेत. तसेच ते ठाकरे गटातील एक वरिष्ठ आणि विश्वासू नेते आहेत. पक्षाची ध्येयधोरणे ठरवताना त्यांची मते विचारात घेतली जातात. याशिवाय संजय राऊत हे पक्षाची मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे विरोधकांचे आरोप परतवून लावण्यासाठी ठाकरे गटासाठी ते हुकमी एक्का मानले जातात. याशिवाय संजय राऊत हे देशपातळीवर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विचारांची आणि लिखाणाची शिवसैनिकांवर छाप आहे. त्यांचे बंधू सुनील राऊत हे विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात संजय राऊत यांना ताकद मिळू शकते.

Mumbai North East Lok Sabha Constituency :
Ed Enquiry Of Sandeep Raut : ईडीकडून परिवार टार्गेट, संजय राऊत कडाडले

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

संजय राऊत यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त शैलीमुळे अनेक वेळा पक्ष अडचणीत आला आहे. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यातील कित्येक आमदारांनी संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानांमुळेच शिवसेना-भाजप युतीमध्ये दुरावा वाढत गेल्याचा आरोप केला. संजय राऊत हे युतीमधील घटकपक्षांवरही सातत्याने टीका करताना दिसून येतात. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते सोडल्यास इतर नेत्यांकडून संजय राऊत यांच्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त केला जातो. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईतून संजय राऊत यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फटका बसू शकतो. कारण या मतदारसंघातील दोनच मतदारसंघ शिवसेनेकडे, तर उर्वरित तीन मतदारसंघ भाजपकडे आहेत.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

संजय राऊत हे सध्या ठाकरे गटाकडून राज्यसभेवर नियुक्त सदस्य आहेत. पक्षफुटीनंतर ठाकरे गटाने राज्यसभेच्या उमेदवारांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये संजय राऊत यांच्याही नावाची चर्चा आहे. राऊत यांनीही आपण पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे गटाकडून संजय राऊत यांना मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य मुंबई) मतदारसंघातून उमेदवारी देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप यावर निर्णय झालेला नाही. शिवाय ठाकरे गट हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोण लढवणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्यास संजय राऊत यांना येथून उमेदवारी मिळू शकते.

पंरतु, इशान्य मुंबई हा मतदारसंघ शिवसेनेला नाही सुटल्यास अथवा शिवसेनेने दुसऱ्याला उमेदवारी दिल्यास संजय राऊत हे राज्यसभेची आपली टर्म पूर्ण करतील. याशिवाय 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत सहभागी झालेले संजय पाटील हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून तिकीट मिळवून भाजपला टक्कर देऊ शकतात. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नोव्हेंबर महिन्यातच तसे सूचक वक्तव्य केले होते. दरम्यान, या मतदारसंघात संजय राऊत यांना उमेदवारी दिल्यास या ठिकाणची निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com