
Mumbai News 15 Feb : महायुतीने (Mahayuti) लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढवली. मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ही युती राहणार की युतीतील मित्र पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
कारण महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) स्थानिकच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवलेली महायुती स्थानिकच्या निवडणुकींमध्ये कायम राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजप नेत्यांकडून घेण्यात येत असलेल्या विविध पातळ्यांवरील बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार का? आणि आगामी निवडणुका तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपकडून स्वबळाची चाचचपणी चालू असली तरी शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
कारण मागील दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजना संदर्भातील एक बैठक मुंबईत घेतली होती. या बैठकीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गैरहजर राहिले आणि मलगंडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यानंतर शिंदेंनी काल स्वतंत्रपणे नाशिकमध्ये जाऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचंही पाहायला मिळालं.
मात्र, शिंदेंनी केवळ कुंभमेळा आढावा बैठकच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेल्या अनेक बैठकांना दांडी मारली आहे. शिवाय अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री असतील त्या मंचावर जाणही शिंदेंनी अनेकदा टाळल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. याच नाराजीमुळे आगामी निवडणुकांसाठी भाजप स्वबळाची चाचपणी करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.