Palghar Hospital Assault Case : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार? पालघर रुग्णालय राडा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, जखमी गोविंदाला...

Shiv Sena Palgar : एमआरआयची प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समूह केंद्रात पोहोचला आणि त्यानंतर ठाकूर याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, हे स्पष्ट झाले आहे.
Palghar hospital ruckus case Shiv Sena office-bearers face investigation
Palghar hospital ruckus case Shiv Sena office-bearers face investigationsarkarnama
Published on
Updated on

निखिल मेस्त्री

Palgar News : पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. ज्या एमआरआय तपासणीवरून शिवसेना पदाधिकारी आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्याच तपासणीत गोविंदा पथकातील केशव ठाकूर याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे एमआरआयची प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समूह केंद्रात पोहोचला आणि त्यानंतर ठाकूर याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. या नव्या वैद्यकीय नोंदी आणि घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील राड्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

गोविंदा पथकातील २२ वर्षीय केशव ठाकूर हा दहीहंडीतील मनोरा रचताना खाली पडल्याने त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयालगत असलेल्या रिलीफ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्याचा एक्स-रे करण्यात आला. दुखापतीचे स्वरूप लक्षात घेऊन डॉक्टरांनी पुढील तपासणीसाठी त्याला रुग्णालयालगतच्या ग्रीन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एमआरआयसाठी पाठविले.

Palghar hospital ruckus case Shiv Sena office-bearers face investigation
Rohit Gavit Custody : पालघर रुग्णालय राडा : आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी

मात्र ठाकूरचा एमआरआय सुरू असतानाच शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते रिलीफ रुग्णालयात पोहोचले. ‘एमआरआय कोणी सांगितला?’ असा सवाल करत रुग्णालयात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप आहे. याच वेळी आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा भाग ठरले आहे. रुग्णालयातील घटनेबाबत १७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींची संख्या वाढत गेली असून २२ जणांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

एमआरआयचा अहवालच ठरला महत्त्वाचा पुरावा

राड्यानंतर केशव ठाकूर याला ग्रीन डायग्नोस्टिक सेंटरमधून पालघरमधील अन्य खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआरआय तपासणीत त्याच्या पाठीच्या मणक्याला व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी डी-१० ते डी-१२ या कशेरुकांवर पोस्टेरिअर स्पाइन फिक्सेशन ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यामुळे रुग्णाला एमआरआयची गरजच नव्हती किंवा तपासणी अनावश्यक होती, असा दावा तपासातील उपलब्ध वैद्यकीय नोंदींशी विसंगत ठरतो का, हा प्रश्न आता तपासाचा महत्त्वाचा भाग ठरण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या संदर्भातील वैद्यकीय कागदपत्रे, एमआरआय अहवाल आणि संबंधित नोंदी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

रुग्णालयातून नेले, पुढे मणक्यावर शस्त्रक्रिया

या प्रकरणातील आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिलीफ रुग्णालयात दाखल असलेल्या गोविंदांना बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आणि त्यानंतर केशव ठाकूर याला एमआरआय केंद्रातून अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बाब. त्यामुळे त्या रात्री नेमके काय घडले, कोणाच्या सूचनेवरून रुग्णाला हलविण्यात आले आणि त्यावेळी कोण कोण उपस्थित होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीची पुढील नोंद आणि झालेली शस्त्रक्रिया यामुळे या प्रकरणातील घटनाक्रमाला आता केवळ ‘एमआरआयवरून झालेला वाद’ एवढ्यापुरते मर्यादित ठेवता येणार नसल्याचे तपासातून पुढे येत आहे.

सीसीटीव्हीपासून वैद्यकीय नोंदींपर्यंत तपास

विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) चंद्रकिशोर मीना यांनी १४ सप्टेंबर रोजी पालघरला भेट देऊन या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली. पोलिसांनी रिलीफ रुग्णालय तसेच ग्रीन डायग्नोस्टिक सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळविल्याची माहिती आहे. याशिवाय आरोपींचे मोबाइल, व्हॉइस सॅम्पल आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासाचा भाग असल्याचे न्यायालयीन कार्यवाहीत समोर आले आहे.

आता सीसीटीव्ही फुटेज, एमआरआय अहवाल, वैद्यकीय कागदपत्रे आणि घटनाक्रम यांची सांगड घालून पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यामुळे एमआरआयला विरोध नेमका कोणत्या कारणातून झाला आणि त्यानंतर जखमी गोविंदाची वैद्यकीय स्थिती काय होती, या दोन प्रश्नांची उत्तरे या प्रकरणातील पुढील कारवाईसाठी महत्त्वाची ठरणार आहेत.दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Palghar hospital ruckus case Shiv Sena office-bearers face investigation
Assault Case : हॉस्पिटल कर्मचाऱ्याला शिवीगाळ, मारहाण; शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार पुत्रासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com