

Thane News, 01 Oct : घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला बुधवारी (ता. ३०) रात्री नवे वळण मिळाले, या प्रकरणाच्या पुरवणी एफआयआरमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे पोलिसांनी समाविष्ट केली आहेत.
पुरवणी एफआयआरमध्ये ही नावे जोपर्यंत समाविष्ट होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा पूर्णेकर कुटुंबीयांनी दिला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीही ही मागणी जोर लावून धरली. त्यामुळे अखेर पोलिसांना पुरवणी एफआरमध्ये शिंदे दाम्पत्यांची नावे समाविष्ट करावी लागली. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.
पूर्णेकर यांच्या हत्येनंतर बुधवारी सायंकाळी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांची भेट घेतली. यावेळी पूर्णेकर यांचा मुलगा राम याच्या तक्रारीवरून मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी दोन्ही नेत्यांनी केली.
मीनाक्षी शिंदे यांच्या घरी हत्येचा कट शिजल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला. राजेंद्र शिंदे हे या कारस्थानाचे सूत्रधार असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोघांना अटक करून हत्येच्या गुन्ह्यासह मकोका अंतर्गत कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र ठाण्यात एकवटेल, असा इशारा त्यांनी दिला. ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून त्यांनी राज्याच्या गृह खात्यावरही टीका केली.
'बाळा-बाळा' अशी हाक ऐकली..!
पूर्णेकर हत्या प्रकरणात रेणू प्रजापती ही प्रत्यक्षदर्शी समोर आली आहे. पूर्णेकर यांच्या कार्यालयाजवळ शिलाईचे दुकान आहे. मुलीसोबत दुकानात असताना शॉर्टसर्किटसारखा आवाज आल्याने ती बाहेर आली. त्यावेळी चार-पाच जणांच्या हातात धारदार शस्त्रे होती. आपल्यासमोरच ते दुचाकीवरून निघून गेल्याचे ती म्हणाली. त्यांचा चेहरा ती पाहू शकली नाही. दरम्यान 'बाळा-बाळा' अशी हाक ऐकू आल्याचे तिने सांगितले.
पोलीस ठाण्यापुढे १० तास ठिय्या
बुधवारी दुपारी पूर्णकर यांच्या नातेवाईकांसह त्यांच्या समर्थकांनी थेट कापूरबावडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. सुमारे दहा तास हे ठिय्या आंदोलन सुरू होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आरोप बिनबुडाचे : मीनाक्षी शिंदे
हत्येनंतर थेट मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केल्याने शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यातील राजकीय संघर्षाला पुन्हा धार आली आहे; मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 'आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असून, पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करतील. तपासातून सत्य समोर येईल,' अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.