

Mumbai News : पुण्यातील कसबापेठ विधानसभेच्या निवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकरांना तिकिटापासून, प्रचारासाठी डावपेच आखणारे, निवडून आल्यानंतर धंगेकरांचे बोट धरून विधानसभेत नेणाऱ्या भरवशाच्या नेत्यामुळे धंगेकरांची मुंबईत गुरूवारी पावसातच फजिती झाली. अधिवेशनातील विधानसभेचे कामकाज संपवून, पुण्यातीलच एका नेत्याच्या गाडीत धंगेकर पुण्याकडे निघाले; पण विधानभवनापासून दोन-चार किलोमीटर अंतरावर तेही 'फ्री-वे'वरच नेत्याची गाडी बंद पडली आणि धंगेकरांची पंचाईत झाली.
त्यानंतर वाहनांची प्रचंड गर्दी असलेल्या 'फ्री वे'वरून धंगेकरांनी वाट काढली, टॅक्सी धरली, सीएसटीवरून रेल्वे गाठली आणि ते पुण्यात पोचले. गंमत म्हणजे, धंगेकर आमदार झाल्यापासून त्यांची पाठ न सोडणाऱ्या या नेत्याने रेल्वे प्रवसातही धंगेकरांना एकटे सोडले नाही, ते दोघेही रेल्वेनेच पुण्यात आले.
पुण्यात धंगेकर हे टू-व्हिलरवर फिरतात. आमदार झाल्यानंतरही ते आपली टू-व्हिलर सोडत नाहीत. पण मुंबईकडे जाताना धंगेकर बहुतेक वेळा काँग्रसच्या एका वरिष्ठ नेत्यासोबत असतात. (अर्थात, हा नेता धंगेकरांसोबत असतो, असे बोलले जाते) धंगेकरांच्या पुणे-मुंबई प्रवासात या नेत्याची गाडी असते. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे, गुरूवारी धंगेकर आणि हा नेता पुण्याकडे निघाले.
परंतू, त्यांची गाडी 'फ्री-वे' येताच बंद पडली. या मार्गावर नेहमीच गर्दी असते, त्यातून धंगेकर आणि नेते बाहेर पडले आणि पुन्हा कार मागवण्याऐवजी धंगेकरांच्या पसंतीच्या रेल्वेच्या प्रवासाला निघाले. सुदैवाने, रेल्वे मिळाली, तिकिटही 'कन्फर्म' झाले. धंगेकर रात्री पुण्यात पोचले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे, शुक्रवारी विधानसभेत धंगेकरांसाठी महत्त्वाची असलेली लक्षवेधी लागल्याने ते सकाळीच पुन्हा मुंबईकडे निघाले. धंगेकरांनी सकाळीच साडेसहा-सात वाजता पुणे रेल्वेस्टेशरून रेल्वे पडकली आणि 'सीएसटी'ला पोचले.
गाडी बंद पडून धंगेकरांची तारांबळ झाल्याची चर्चा हळूहळू पसरू लागली आहे. त्यातूनही धंगेकर आणि भरवशाच्या त्या नेत्याची 'दोस्ती'ची पुन्हा एकदा सगळ्यांपुढे आली. अधिवेशनच्या काळात विधानभवन आणि मंत्रालयातही हे दोघे एकत्र फिरतात. त्यामुळे धंगेकर आणि या नेत्याच्या जोडीची काँग्रेस वर्तुळात चर्चा असते. काहीही असो, हा नेता मात्र, धंगेकरांसाठी खरोखरीच ताकदीचा आहे; ते धंगेकरही खासगी बोलून दाखवतात. परंतू, काँग्रेस पक्षातील अनेकांना या दोघांची जोडी खुपत नाही. तरीही, धंगेकर हे या नेत्याला मानतात; तर नेताही धंगेकर हे आपल्या हातून सुटणार नाहीत, याची काळजी घेतात. काँग्रेसमध्ये असे खेळ खेळावेच लागतात.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.