मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर आज बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याची उलटत पासणी घेण्यात आली. या तपासणीदरम्यान, वाझेने अनेक प्रश्नांचा उलगडा केला आहे.
बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला नुकतेच चांदीवाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने तो केवळ एक छोटे प्यादे असल्याचे सांगितले होते. तसेच, समितीवर पूर्णपणे विश्वास असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. त्याने स्वत:ला प्यादे म्हटले असल्याने मोठे खेळाडू कोण, असा प्रश्न उपस्थित झाला होते. देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांच्या वतीने शेखर जगताप यांनी आज वाझेची उलट तपासणी घेतली. यात वाझेंनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहे. ही उलट तपासणी संपली असून, पुढील सुनावनी उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे.
अनिल देशमुख यांनी तुम्हाला पुन्हा पोलीस सेवेत रुजू होण्यास सांगितले होते, याचे पुरावा तुमच्याकडे आहेत का? या प्रश्नावर माझ्याकडे विनंती पत्राशिवाय इतर कोणतेही रेकॉर्ड नाही, असे उत्तर वाझेने दिले. पालांडे ओळखत असल्याची कबुलीही वाझेने दिली. मात्र, त्यांच्याशी जवळीक अथवा मैत्री असल्याचा इन्कार केला. परमबीरसिंह यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेल्या आरोपांबाबत माहिती होते का? या प्रश्नावर मला आठवत नाही, असे उत्तर वाझेने दिले.
परमबीरसिंह यांच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे तुम्ही ज्ञानेश्वरी बंगला परिसरात फेब्रुवारी 2021 मध्ये भेट दिली होती का आणि पालांडेला भेटला होता का? यावर भेटीची कबुली वाझेने दिली परंतु, याचे पुरावे नसल्याचे सांगितले. याचबरोबर पालांडे यांच्याशी पैशासंदर्भात काही चर्चा झाल्याचाही वाझेने इन्कार केला. यामुळे देशमुख यांच्यावरील आरोपांतून वाझेने अंग काढून घेतल्याचे दिसत आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा ही समिती करीत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.