Mumbai News : 8 हजार करोडचा अॅम्ब्युलन्स घोटाळा करण्यासाठी एका अधिकाऱ्यावर दबाव आणण्यात आला. आरोग्य विभागाचाच नव्हे, तर राज्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. घोटाळेबाज व्यक्ती सरकारमध्ये बसले आहेत, मुख्यमंत्री दावोसमध्ये आहेत.
आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला, त्याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही. हा पैसा नेमका महाराष्ट्रात जातो, की दिल्लीत जातो की गुजरातला जातो. आमदार आमच्यापासून तोडले त्या आमदारांना हा पैसा वाटला की विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना आमच्याविरोधात निकाल देण्यासाठी हा पैसा देण्यात आला, असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
'एकूण 800 अॅम्ब्युलन्स आहेत. एक अॅम्ब्युलन्स 50 लाखांची आहे. ते सर्व मी बघितले. आठ हजार कोटी रुपयांचा हिशोब कुठून आला. हा पैसा कोणाच्या खिशात जात आहे,' हा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 'टेंडर कोणाला मिळाले आहे तो कोणाचा नातेवाईक आहे, याची चौकशी झाली नाही.
एवढा मोठा घोटाळा झाला आहे, तर ईडी, सीबीआयसारख्या संस्था नेमकं काय करीत आहेत,' असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. 'विरोधकांना तुम्ही दोन-चार लाखांसाठी अडकवता तर एवढा मोठा 8 हजार करोड रुपयांचा अॅम्ब्युलन्स घोटाळा दिसला नाही का? खिचडी वाटप घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा यासंदर्भात सारखे विचारत असतात. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये एकही रुपयाचा घोटाळा नसल्याचा दावा यावेळी राऊत यांनी केला.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हिंदू धर्माचे मुख्य चार पीठ म्हणजे हे शंकराचार्य आहेत. अचानक भाजपने शंकराचार्यांचे बोलणे खोटे ठरविण्यास सुरुवात केली आहे, तर मग भाजप (BJP) स्वतःच पाचवं पीठ तयार करणार का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
सूरज चव्हाण हे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत आणि राजन साळवी शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत. दोन्ही नेते निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिले आहेत. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दबाव आहे. त्याचबरोबर रवींद्र वायकर यांच्यावरही दबाव आहे. तुम्ही जर शिवसेना सोडून शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सीमार्फत कारवाई करण्यात येईल. तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल, अशा प्रकारचे धमकीवजा निरोप त्यांना येत आहेत.
चव्हाण यांनी ऐकलं नाही ते चौकशीला सामोरे गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी आम्ही जे जनता न्यायालय केले आणि त्याचा जो एक मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला त्याच्या दुसऱ्याच दिवशी सूरज चव्हाण यांना अटक केली. ही राजकीय अटक आहे. खोट्या कारवाई करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही चौकशीला सामोरे जाऊ. 38 अशाही कंपन्या आहेत ज्यांनी खिचडीचे वाटप केले नाही आणि मुंबई महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची बिले उकळली. हे सगळेजण आज शिंदे गटात किंवा बीजेपीमध्ये आहेत. या सर्वांची चौकशीदेखील केली नाही. मी भविष्यात लवकरच त्या 35 संस्थांची नावेदेखील जाहीर करेन, असे राऊत यांनी सांगितले.
R...