Mumbai News: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसह एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत बेडवर बसून शिरसाट सिगारेटही ओढताना दिसत होते, तसेच शेजारी एक बॅग असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा व्हिडिओ उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समोर आणला होता. विशेष म्हणजे हा व्हिडिओ आपलाच असल्याचं खुद्द शिरसाट यांनी मान्य केलं होतं. आता त्यांनी या प्रकरणातून धडा घेतला असून मोठी बाब समोर आणली आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी साम वृत्तवाहिनीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या कार्यक्रमात गुरुवारी(ता.7) विशेष मुलाखत दिली. या कार्यक्रमात त्यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी यावेळी बेडरुममधील व्हिडिओवरही भाष्य केलं.
ते म्हणाले, बेडरूमची बॅग इतकी फेमस झाली आहे. त्यामुळे आता मी कोणाला बेडरूममध्येच काय, तर घरामध्येही एन्ट्री देत नाही. कोण कुठे कॅमेरा लावून येतील सांगता येत नाही. परंतु, तो व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याचा आरोपही संजय शिरसाटांनी यावेळी केला.
शिरसाट म्हणाले, हे महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले. अशात त्या सरकारमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणे, नाराज होणे, हा प्रकार सुरू केला, तर लोकं आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील. हे सत्तेसाठी हापापले होते, असा देखील समज लोकांमध्ये जाऊ शकतो. आम्हीही समजून घेतलं, आम्हालाही वाटतं, आपण उघड बोलायला नको, म्हणून मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आता महायुतीत सगळं आलबेल झालं आहे,असंही त्यांनी सांगितलं.
मंत्री संजय शिरसाटांनी याच कार्यक्रमात शिवसेनेच्या आक्रमक स्टाईलवरही परखड मत व्यक्त केलं. ते म्हणाले, आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत घडलो आहोत. आमच्या अंगात जो काही गुण आहे, तो नेहमी सळसळ करत असतो. एखादेवेळी मला राग आला, तर काय खरं नाही. नंतर काय होईल ते होईल, आपण बोलून मोकळे व्हा, असं माझं असतं. पण आमच्यात बांगरांचा स्वभाव वेगळा आहे, भरत गोगावलेंचा स्वभाव वेगळा आहे आणि माझाही स्वभाव वेगळा आहे. यात फरक आहे. भरत साधाही बोलला, तरी त्याची बातमी होते. मी रागावून बोललो आणि शांत बोललो, तरीही त्याची बातमी होते असा दावाही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या गद्दार..गद्दार या टीकेलाही संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, मला कधी-कधी उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) आश्चर्य वाटतं. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तुम्ही गेल्यावर गद्दारी होत नाही का? शिवसेनाप्रमुखांनी जे सांगितलं, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, नाहीतर माझे दुकान बंद करेन. आजही काँग्रेसची विचारसरणी शिवसैनिकाला आवडते का? शरद पवारांबद्दल शिवसैनिकाला प्रेम आहे का? त्यांना विचारा. या सर्व विचारांच्या विरोधात तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा खरी गद्दारी तुमची आहे. असा पलटवारही त्यांनी केला.
एकनाथ शिंदेंनी आमदार -खासदारांंसह केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे फोटो वापरु नका असं सुनावलं होतं. त्यावर शिरसाट म्हणाले, आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा बाळासाहेबांचा फोटो वापरू नका असं त्यांनी म्हटलं. ही एक स्ट्रॅटेजी असते. बाळासाहेबांना आपल्याकडे ओढून घ्यायचं, आणि शिवसेना बाळासाहेबांची की, आमची असं म्हणायचं. आम्ही सोडलंच नाही, त्यामुळे आजही त्यांची तीच फजिती होते.
पण बाळासाहेबांचा फोटो वापरायचा हा निर्णय आमच्या सर्वांचा होता. शिवसेनाप्रमुखांशिवाय आपली शिवसेना नाहीच, हे आमचं पहिल्या दिवसापासून ठरलेलं होतं. काहीही झालं, तरी शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या घोषणा, भगवा झेंडा, धनुष्यबाण, हे पहिल्यादिवसापासून ठरलं होतं. म्हणून आम्हाला वेगळं धरायचं असं कधी वाटलं नाही आणि आजही वाटत नाही
आम्ही जे 60 आमदार निवडून आलो आहोत, त्यांना विचारा, तुझ्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा कुणाचा आहे? ते स्पष्टपणे सांगतील, एकनाथ शिंदे साहेबांमुळे आम्हाला सर्वात जास्त फायदा झाला. आम्ही शिंदेसाहेबांना म्हटलं होतं की, 120 जागा लढवू. तेवढ्या लढवल्या असत्या, तर आम्ही शंभरी गाठली असती असा विश्वासही शिरसाटांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.