शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देण्यापूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय शिरसाट यांनी यावेळी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. आम्ही केलेला उठाव हा कायदेशीर आहे आणि आपले 14-15 आमदार हे अपात्र होतील, म्हणून त्यांनी केलेली ही कसरत आहे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. आमचीच खरी शिवसेना आहे. आम्ही गट किंवा पक्ष स्थापन केलेला नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
ज्या दिवसापासून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणी घेत आहेत. त्यावरही ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली. निकाल काय लागेल, याची मलाही उत्सुकता आहे. 14 आमदारांचे काय होईल, याची धाकधूक आहे. निकाल आमच्या बाजूने लागला तर ते अपात्र ठरतील आणि त्यांची आमदारकी रद्द होईल, असे शिरसाट म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाकरे गटाने अनेक चुका केल्या आहेत. व्हीपवर तारीख वेगळी. मग ती खोडण्यात आली. त्यांचे सगळे पुरावे खोटे आहेत, म्हणून ते मॅच फिक्सिंग आहे, असे ते म्हणतील. स्क्रीप्ट आधीच लिहिलेली आहे असे म्हणतील. परंतु हरलो आहे, असे ते म्हणणार नाहीत. नाचता येईना अंगण वाकडे, अशी अवस्था ठाकरे गटाची झाल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली.
निकाल आपल्याविरोधात जाणार हे ठाकरे गटाच्या 14 आमदारांना माहिती आहे. परंतु ते स्वीकारणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या निकालावर ताशेरे ओढणे, वारंवार सर्वोच्च न्यायालयात रिट दाखल करणे, आणखी आमदार जाऊ नये, हा यामागचा अर्थ होता. हा ठाकरे गटाचा केविलवाणा प्रयत्न होता. आता त्यांना कळले आहे, आपले खरे नाही. आता निकाल येऊ द्या. त्यानंतर आणखी काही घडामोडी झालेल्या तुम्हाला दिसतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.