

डोंबिवली : शिवसेनेचा (शिंदे गट) कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा शनिवारी कल्याणमध्ये पार पडला. या मेळाव्यादरम्यान शिवसेनेचे (शिंदे गट) कल्याण पश्चिमेचे शहर प्रमुख रवी पाटील हे आपल्याच पदाधिकाऱ्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.
"या मेळाव्याची लाज कल्याण पश्चिमेतील शिवसैनिकांनी राखली. तसेच कल्याण पूर्व आणि डोंबिवलीचे शिवसेनेचे नेते फक्त स्वत:चीच टिमकी वाजवून स्टेजवर मिरवतात", असे खडे बोल रवी पाटील यांनी शिवसेनेच्याच (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांना सुनावले.
आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांवर ते भडकल्याने याची मोठी चर्चा रंगली आहे. मात्र, आपण केलेल्या या वक्तव्यानंतर रवी पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण या निमित्ताने पक्षातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येत तर नाही ना? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
रविवारी कल्याण पश्चिमेत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महिलांना कचरा डब्बा व साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक संजय पाटील, अरविंद मोरे, छाया वाघमारे, नेत्रा उगले, मोहन उगले, श्रेयस समेळ आदी उपस्थित होते. यावेळी रवी पाटील यांनी शिंदे गटातील कल्याण पूर्व आणि डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांना चांगलच सुनावलं.
रवी पाटील म्हणाले, "दोन हजार लोकांचा मेळावा घेण्याचा आदेश आला. 24 तासात लोक जमवा असे सांगण्यात आले. पण 24 तासात कोणत्याही नेत्याला लोकं जमविणे शक्य नाही. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मेळावा होता. मी म्हटलं पाच हजार लोकं जमले पाहिजे, अशी मनस्थिती होती. कालच्या मेळाव्याला कल्याण पश्चिमेतील 1200 ते 1500 लोक आले. मी स्वत: गेटवर होतो".
"पण कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीचे नगरसेवक सोडले तर एकही माणूस आला नाही. उगाच येऊन टिमक्या वाजवायच्या. म्हणजे महेश गायकवाड असतील मल्लेश शेट्टी असतील. जे कोणी असतील. डोंबिवलीचे कुणी दिसले नाही. स्टेजवर मिरविणारे असतात. नेत्यांना दाखविण्यासाठी स्टेजवर मिरवायचे. आपल्या लोकांविषयी बालले नाही पाहिजे. मात्र, फक्त कल्याण पश्चिमेतील लोकांनी मेळाव्याची लाज वाचविली", असं म्हणत त्यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
दरम्यान, कार्यक्रमानंतर आपल्या वक्तव्यावर शहर प्रमुख पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, "ज्या शहरात मेळावा असतो. त्या शहरातील लोक जास्त येतात. कल्याण पूर्वेला लोकग्राम पादचारी पूलाचे भूमीपूजन होते.
तेव्हा त्याठिकाणी कार्यकर्ते व्यस्त होते. तसेच कमी वेळेत मेळाव्याची सूचना दिली गेली होती", असं म्हणत त्यांनी स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण भाषणादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.