

Mumbai News: माजी मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर त्यांना पक्षांतराचं बक्षीसही मिळालं असून त्यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या उपसभापतीची माळ पडली आहे. आता याच सचिन अहिरांबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
विधानपरिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानाहून गेल्या पाच वर्षांत सुमारे 2.65 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती. सचिन अहिर यांनी ही तक्रार मुंबई गुन्हे शाखेकडे दिली होती. त्यांच्या घरातील चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सचिन अहिर यांच्या निवासस्थानी घरकामाला असलेल्या विश्वासू नोकरालाच अटक केली आहे. त्याचं नाव प्रवीण सोलंकी असं आहे. तो गेल्या 24 वर्षांपासून अहिर यांच्या घरी कामाला आहे. त्यानं याच विश्वासाचाच गैरफायदा घेत टप्प्याटप्प्याने चोरी केल्याचं समोर आलं आहे.
सोलंकी याने चोरी केलेल्यांमध्ये सचिन अहिर यांच्या घरातील मौल्यवान दागिनेही त्यानं लंपास केले आहे. त्यात सोन्याची बिस्किटे, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रकमेवरही त्यानं डल्ला मारला आहे. घरातील नोकरानेच दगाफटका केल्यानंतर सचिन अहिर यांच्या तक्रारीनंतर मुंबई गुन्हे शाखेनं काही तासांतच सोलंकी याला अटक करत पहिलं मोठं यश मिळवलं.
आरोपी प्रवीण सोलंकी याने सचिन अहिर यांच्या घरातील चोरी केलेले मौल्यवान दागिने वा वस्तू यांची विक्री करत त्यातून आलेले पैसे साथीदारांमध्ये वाटल्याची कबुलीही पोलिसांसमोर सोलंकी याने दिली आहे. अटक केल्यानंतर त्याला पोलिसांनी फोर्ट येथील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. यावेळी न्यायालयाने सोलंकीला 30 जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
गुन्हे शाखेचे डीसीपी राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 2025 मधील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज खराब झाल्याने चोरट्यांनी फायदा घेतला. घरातील चार नोकरांनी पद्धतशीरपणे चोरी केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
सचिन अहिर यांच्या घरातील चौरीचा धक्कादायक प्रकार हा 16 जुलै 2026 रोजी हे पहिल्यांदा उघडकीस आला. अहिर हे आपल्या कुटुंबासह वरळी सी फेस येथील गुलरुख इमारतीत वास्तव्याला आहेत. तसेच प्रवीण सोलंकी हा त्यांच्या घरी गेल्या 24 वर्षांपासून साफसफाईचं करत होता. त्याचमुळे वरळीतील त्यांच्या कार्यालयातील स्वच्छतेचं कामही त्याच्याकडेच देण्यात आलं होतं.
शिवसेना आमदार सचिन अहिर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला घरातील चोरीबद्दलची कुणकुण लागली होती. त्यात सोलंकी व्यतिरिक्त अहिर यांच्या घरातील इतर कामगारांपैकी सतीशकुमार मिस्त्री आणि अमितकुमार प्रसाद यांना कमी पगार असतानाही त्यांच्या झारखंडमधील गावात नवीन घर, नवीन वाहनं आणि इतर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सोलंकीवरचा चोरीचा संशय बळावला होता.
याप्रकरणी पोलिसांनी इतर नोकरांची चौकशी करण्यात आल्यानंतर चोरीचे प्रकरण उघडकीस आले. गुन्हे शाखेनं दिलेल्या 13 ऑक्टोबर 2025 रोजी शॉर्ट सर्किटमुळे घरात आग लागली होती. या घटनेवेळी काही रक्कम चोरीला गेल्याचं समोर आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.