पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजपने तिकीट नाकारले. त्यानंतर त्यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना तिकीट नाकारल्यानंतर लगेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ते अपक्ष उभे राहिल्यास पाठिंबा देऊ असं जाहीर केलं होतं. आता हा शब्द ते पाळणार असून शिवसेनेचा उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याचे राऊतांनी जाहीर केलं. (Goa Election 2022)
उत्पल पर्रीकर यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गोव्यातील राजकारणाला (Goa Politics) वेगळं वळण मिळालं आहे. त्यांचा अर्जही वैध ठरला आहे. त्यामुळे भाजपची पणजी मतदारसंघात डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेने पणजीमधून शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे. मात्र राऊत यापुर्वी म्हटले होते की, मी माझा उमेदवार सध्या जाहीर करत आहे. पण, पर्रीकरांचा जर अपक्ष लढण्याचा निर्णय झाला तर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. जर अर्ज दाखल केल्यानंतर पर्रीकरांचा निर्णय झाला तर अर्ज मागे घेऊ, असेही त्यांनी आश्वासन दिले होते. (Goa Election Update)
राऊत यांनी रविवारी पणजी येथे दाखल होताच माध्यमांशी बोलताना वेलिंगकर हे उमेदवारी अर्ज मागे घेतील, असं स्पष्टपणे सांगितले. पणजी मतदारसंघात शिवसेनेचे कार्यकर्ते पर्रीकर यांचा प्रचार करतील. तसेच मुंबईतील कार्यकर्तेही पणजी येऊन प्रचार करतील, असेही राऊत यांनी स्पष्ट केलं.
गोव्यातील लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोवा विधानसभेत शिवसेनेचा आमदार पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार किती भ्रष्ट आणि फसवे आहे, हे लोकांपर्यंत पोहचवत आहोत. आज अमित शहा गोव्यात येत आहेत, घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत, हे चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत, पण शहा घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. स्वागत आहे. पक्ष म्हणून अशी निष्ठा हवी, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
दरम्यान, उत्पल पर्रीकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी भाजपसमोर त्यांनी एकमेव अट ठेवली होती. ती अट म्हणजे, भाजपने पणजीतून चांगला उमेदवार द्यावा. भाजपने चांगले उमेदवार दिल्यास ते माघार घेतील, असे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. भाजप सोडण्याचा निर्णय अतिशय अवघड होता, असेही त्यांनी म्हटले होते. परंतु, भाजपने पणजीतून बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी कायम ठेवल्याने पर्रीकर यांनी लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. (Utpal Parrikar News Updates)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.