.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai News : महाराष्ट्रात प्रचंड बहुमतासह सत्तेत येऊन महायुती सरकारला सहा महिने लोटले आहेत. अशातच आता महायुती सरकारमधील एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कुरघोडी आणि आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापू लागलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना आव्हान देण्याची भाषा केली जात आहे. जे महाविकास आघाडीत घडलं, त्याचीच पुनरावृत्ती महायुती सरकारमध्ये घडण्याची दाट शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या आमदारांनंतर आता मंत्र्य़ांनीही उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी तीव्र नाराजी बोलून दाखवली आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या मंत्र्यांची एक विशेष आणि महत्त्वपूर्व बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत समोरासमोर चर्चा केली. सरकारमधील कामकाज आणि निधी यांच्याविषयीचे मुद्देही या बैठकीत चर्चेत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी उघडउघडपणे बोलून दाखवली. त्यामुळे एकीकडे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यासह आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय भडका उडाल्यानंतर आता मंत्र्यांनी अजित पवारांना टार्गेट केलं आहे.
शिंदेंचे सर्वच्या सर्व मंत्री आणि आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असल्याचं आता लपून राहिलेले नाहीत. शिंदेंनी या बैठकीत प्रत्येक खात्याचा आढावा तर घेतलाच शिवाय खात्याचे काम, पेंडिग कामे, झालेली कामे, निधी संदर्भातल्या तक्रारी यांसह विविध बाबींची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांकडून जाणून घेतली.याचवेळी त्यांनी लवकरात लवकर कामे पूर्ण करा, फाइल पेंडिंग ठेऊ नका अशा सूचनाही केल्या.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत आढावा घेतला आहे. या बैठकीत मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. अजित पवार आमच्या विकासकामांवर खोडा घालत असून अर्थमंत्रीच जर आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही विकासकामं कशी करणार? अशी चिंताही शिवसेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी महायुती सरकारमध्ये सगळ्यांना समान अधिकार मिळायला हवेत, असंही म्हटलं. यानंतर शिंदेंनी स्वत: अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि मार्ग काढेन, असा शब्द मंत्र्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.