Mumbai News, 31 July : मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
'आता एक तर तू राहशील नाहीतर मी तर राहीन', अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरेंनी भाजप नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावर आता भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंचं आव्हान हे पोकळ असल्याचं म्हटलं आहे.
दरेकर म्हणाले, "देवेंद्रजींनी राजकारण समर्थपणे केलं आहे. पाच वर्ष उत्तम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. आता देखील दोन्ही पक्षांना सोबत घेऊन राज्यातील सरकार जनतेच्या हितासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करत आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) देवेंद्रजींबद्दल कमालीचा द्वेष आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील अशा भावना उफाळून येत असतात, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर पलटवार केला.
तसंच फडणवीसांवर (Devendra Fadnavis) बोलल्याशिवाय त्यांच्या मनाचं समाधान होत नाही. त्यामुळे ते मनातला राग काढतात. पण देवेंद्र फडणवीस हे कधीच नाक्यावरचं भांडण असल्यासारखं बोलत नाहीत. ते महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणी आहेत. अरे ला कारे ते कामातून करतात, असंही दरेकर म्हणाले.
पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आताही ज्यांना जायचं असेल त्यांनी खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचं असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. आता तर मी या तडफेने उतरलोय की, एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन. कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत.
अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन, अशा एकेरी शब्दात त्यांनी फडणवीसांना इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.