Ravindra Phatak News : विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आज अंतिम दिवस आहे. त्यामुळे राज्यभर मोठ्या घडामोडी घडत असताना ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.
येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजित पवार हे उमेदवार होते. त्यांचा अर्ज देखील वैध ठरला होता. मात्र, आज अचानक त्यांनी वैयक्तीक कारण सांगत निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे फाटक यांचा विजय निश्चित झाला आहे.
ठाणे विधान परिषदेसाठी अपक्ष अथवा बंडखोर उमेदवार रिंगणार नव्हते. त्यामुळे अभिजित पवार विरुद्ध रवींद्र फाटक अशी थेट लढत होण्याची शक्यता होती. मात्र, पवार यांनी माघार घेतल्याने फाटक हे आता बिनविरोध विजयी होणार आहेत.
भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेंच होती. बहुजन विकास आघाडीला एकनाथ शिंदेंनी सोबत घेत भाजपवर मात करण्याची तयारी सुरू केली होती. अखेर दिल्लीमध्ये तोडगा निघत ही जागा शिवसेनेला मिळाली. तर, मविआमध्ये ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे होती.
भाजपचे इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. मात्र, निवडणुकीत ते वेगळा निर्णय घेतील का याची देखील चर्चा होती. भाजपचे आमदार रवींद्र फाटक हे अर्ज दाखल करताना हजर नव्हते. त्यामुळे महायुतीत सर्व अलबेल नसल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे फाटक यांना ही निवडणूक जड जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, ऐनवेळी अभिजित पवार यांनी माघार घेत फाटक यांचा रस्ता मोकळा केल्याचे बोलले जात आहे.
ठाण्याची जागा ही एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेची होती. या जागेसाठी भाजप आग्रही होती. मात्र, शिंदेंनी ही जागा आपल्याकडे खेचून आणली. स्थानिक स्वराज संस्थेमध्ये या मतदारसंघात भाजपकडे जास्त संख्याबळ होते. मात्र, बहुजन विकास आघाडीच्या मदतीने शिंदेंनी आपले संख्याबळ वाढवले होते. त्यात आता रवींद्र फाटक यांची बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे ठाण्याचे किल्लेदार एकनाथ शिंदे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.