Lok Sabha Election 2024 : शिवसेनेच्या आक्रमक आणि अभ्यासू नेत्यांपैकी एक म्हणून राहुळ शेवाळेंना ओळखले जाते. शिवसैनिक, शाखाप्रमुख म्हणून काम करत असताना राहुल शेवाळे यांनी पक्षामध्ये आपल्या कामाची छाप पाडली. याच कर्तृत्वाच्या जोरावर मुंबई महापालिकेतील एक वलयंकित चेहरा म्हणून त्यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला. सलग चारवेळा मुंबईच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. पक्षाने विश्वास टाकत लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर दोनदा विजय मिळवून ते लोकसभेत पोहोचले.
राहुल शेवाळे यांनी शिवसेना फुटीनंतर पक्षनिष्ठेला रामराम ठोकत शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते सातत्याने शिंदे गटाची बाजू आक्रमकपणे मांडताना दिसून येत आहेत. पूर्वाश्रमीच्या शिवसेना पक्षप्रमुखांवरही तोंडसुख घेण्यात शेवाळे मागे पुढे पाहत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या याच आक्रमकपणाचे आणि हुशारीचे भांडवल करत शिंदे गटानेही लोकसभेत त्यांना शिंदे गटाच्या खासदारांचे गटनेतेपद बहाल करून टाकले.
आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. जागावाटपाचा तिढा निर्माण न झाल्यास शेवाळे यांना पुन्हा एकदा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळवत विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. सध्या या मतदारसंघातून भाजपही आपला उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गटाला जागा न सुटल्यास शेवाळे काय भूमिका घेणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, शेवाळे यांच्या राजकीय कारकीर्दीवर दृष्टीक्षेप टाकल्यास त्यांचा हा प्रवास उत्कर्षाचाच असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सलग चार वेळा मुंबई महापलिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांना मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. मोदी लाटेत शेवाळे यांचा विजय झाला.
या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचा पराभव करत काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडले. पुढे 2019 च्या निवडणुकीतही शिवसेना-भाजप युतीच्यावतीने राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा लोकसभेची संधी दिली. या निवडणुकीतही शेवाळे यांचा काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी सुरतमार्गे गुवाहटी गाठत बंड केले आणि शिवसेना पक्षावरच दावा ठोकला. शेवाळे यांनी शिंदे गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.
राहुल रमेश शेवाळे
14 एप्रिल 1973
सिव्हिल इंजिनीअरिंग (डिप्लोमा)
राहुल शेवाळे यांचे वडील रमेश संभाजी शेवाळे हे भारतीय नौदलाचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. आई जयश्री शेवाळे या एमटीएनएलच्या कर्मचारी म्हणून सेवेत होत्या. राहुल शेवाळे यांना दोन भाऊ आहेत. त्यांचे मोठे भाऊ अविनाश शेवाळे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ते अमेरिकेत स्थायिक आहेत. दुसरे भाऊ नवीन शेवाळे हे पेशाने डॉक्टर आहेत. राहुल शेवाळे यांचा विविह 14 फेब्रुवारी 2005 रोजी मुंबईच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेतील सहकारी कामिनी मयेकर यांच्यासोबत झाला. कामिनी शेवाळे या श्री राधे फाउंडेशनचे कामही पाहतात. शेवाळे यांना स्वयम आणि वेदांत अशी दोन मुले आहेत.
कॉन्ट्रॅक्टर
दक्षिण मध्य मुंबई
शिवसेना (शिंदे गट)
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून झाला. तत्पूर्वी, महाविद्यालयीन जीवनात त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अजिंक्य पॅनेलच्या माध्यमातून जीएसपद मिळवले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. हे करत असताना त्यांची गटप्रमुख म्हणून वर्णी लागली. पुढे 1998 मध्ये त्यांना शिवसेनेच्या शाखाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. शाखाप्रमुख म्हणून त्यांनी सर्वसामान्य जनतेची कामे करण्यात स्वतःला झोकून दिले.
शाखाप्रमुख म्हणून काम करणाऱ्या राहुल शेवाळे यांची प्रसिद्धी वाढत चालली होती. त्याचीच दखल घेत शिवसेनेने 2002 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले. तीन टर्म नगरसेवक असणाऱ्या फिलिप इसो यांचा पराभव करत राहुल शेवाळे मुंबई महापालिकेत आले. पुढे 2004 मध्ये ट्रॉम्बे विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. मात्र अटीतटीच्या लढतीत शेवाळे यांचा पराभव झाला. पुन्हा 2007 आणि 2012 ला नगरसेवक म्हणून ते निवडून आले.
राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी राहुल शेवाळे यांनी 2012-2014 या काळात मुंबई महापलिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेनेने त्यांना मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. मोदी लाटेत शेवाळे यांचाही विजय झाला. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचा पराभव करत काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडले. एकनाथ गायकवाड यांचा 1,38,180 मतांनी पराभव झाला. शेवाळे यांना 3,81,008 मते मिळाली होती.
पुढे 2019 च्या निवडणुकीतही शिवसेना -भाजप युतीच्यावतीने राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीची संधी मिळाली. या निवडणुकीतही शेवाळे यांनी विजयी घौडदौड सुरूच ठेवली. त्यांना 4,24,913 मते मिळाली होती, तर एकनाथ गायकवाड यांना 2,72,774 मते मिळाली होती. त्यानंतर जुन 2022 ला एकनाथ शिंदे यांनी सुरतमार्गे गुवाहटी गाठत बंड केले आणि शिवसेना पक्षावरच दावा ठोकला. यात राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.
शेवाळे यांच्या श्री राधा फांउडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यांनी संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारनेही खांद्याला खांदा लावून काम करावे, प्रसंगी मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढावा अशी मागणी त्यांनी केली होती. कोरोनाच्या काळात इन्फोडोसच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात शेवाळे यांनी पुढाकार घेतला होता.
शेवाळे यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुका शिवसेना आणि भाजपने एकत्र लढवल्या होत्या. यावेळी मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता. शिवसेनेने पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्याशी शेवाळे यांचा सामना रंगला होता. याही निवडणुकीत गायकवाड यांचा पराभव करत शवाळे यांनी पक्षाचा विश्वास सार्थ केला. या निवडणुकीत शेवाळे यांच्या विजयाचे प्रमुख कारण मोदी लाट होती. ते युतीचे उमेदवार असल्याने मतदारसंघात प्रचारासाठी भाजपची दिग्गज फौजही सोबतीला होती.
ती निवडणूक शिवसेनेने मोदीच्या नावांचा वापर करूनच लढवली होती, असा दावा भाजपकडून आजही केला जातो. त्यांच्या दाव्यानुसार शिवसेनेचे खासदार निवडून यायला मोदींचा करिश्माच कारणीभूत ठरला होता आणि त्याचे लाभार्थी शेवाळे हे देखील मानले जातात. शेवाळे यांची ही लोकसभेची दुसरी टर्म होती. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केली होती. मोदी सरकारचीही पहिली टर्म असल्याने केंद्राकडूनही विकासकामांचा धडाका लावण्यात आला होता. त्याचाही फायदा शेवाळे यांना झाला.
या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना सत्तेत येण्यामागे आणखी एक मोठे कारण होते. ते म्हणजे पुलवामामध्ये घडलेला हल्ला आणि त्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून निर्माण झालेली क्रोधाची लाट याचा फायदा एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजप आणि शिवसेनेला झाला. कारण हल्ल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये युतीच्या प्रचारात या हल्ल्याची ही एक किनार होती. त्याचाही फायदा एनडीएतील घटक पक्षांना झाला, तसाच उमेदवारांनाही झाला, हे विसरून चालणार नाही.
यासह राहुल शेवाळे यांनी निवडणुकीच्या प्रचारात पुढील 15 वर्षांचा मुंबई आणि मतदारसंघाच्या विकासाचा प्लॅन सादर केला होता. धारावी झोपडपट्टीच्या विकासाचेही आश्वासन पुन्हा एकदा दिले होते. त्याचाही फायदा त्यांना झाला. या सर्व परिस्थितीत एकनाथ गायकवाड यांना केवळ त्यांच्या मतदारसंघातून मतांची आघाडी मिळाली होती. इतर ठिकाणी त्यांना मतदान मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.
राहुल शेवाळे यांचा शिवसेना शाखाप्रमुख, नगरसेवक ते खासदार असा राजकीय प्रवास झाला आहे. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यातच दादर,चेंबूर, माहीम हा शिवसेनेचाच गड मानला जातो. या ठिकाणी शिवसैनिकांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे शेवाळे यांचे मतदारसंघातील नेटवर्कही चांगले असल्याचे मानले जाते.
राहुल शेवाळे हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. प्रचाराचे आणि जनसंपर्काचे माध्यम म्हणून ते सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करताना दिसून येतात. मतदारसंघातील विकासकामांबाबत संसदेत विचारलेले प्रश्न, त्यासाठी केलेला पाठपुरावा, राजकीय घडामोडी, टीका, आरोप- प्रत्यारोप यावर ते सोशल मीडियावरून व्यक्त होतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना, विकासकामांची माहितीही ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात.
शेवाळे हे सुशिक्षित आणि आक्रमक राजकारणी आहेत. आरोप -प्रत्यारोप करत असताना ते विरोधाकांवर तुटून पडतात. मात्र काही वेळेस त्यांचीच वक्तव्ये त्यांच्यासाठी अडचणीची ठरल्याचे प्रकारही घडले आहेत. एका महिलेने शेवाळे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते. त्यावेळी शेवाळे यांनी त्या महिलेचेच दाऊशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे कोर्टाने त्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शेवाळेंवर मोक्का लावण्याची मागणी केली होती.
दरम्यान, शिवसेना फुटीनंतर राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास तयार होते. मात्र भाजपचे 12 आमदार निलंबित केल्यामुळे ती चर्चा पुढे झाली नाही, असा दावा केला होता. याबरोबच सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या फोनवर आलेले AU नावाचे फोन कॉल्स हे आदित्य ठाकरे यांचे असल्याचा आरोप त्यांनी संसदेत केला होता.
केंद्र सरकारने मुंबईचा आकस धरून गुजरातवर प्रेम दाखवत ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र’ गुजरात येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ते आयएफएस केंद्र मुंबईबाहेर गेले तर मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखला जाईल, असा थेट इशाराच राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला होता.
बाळासाहेब ठाकरे, मनोहर साळवी
राहुल शेवाळे हे मागील दोन टर्म मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे या मतदारंसघांत विकासाची कामे करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. त्याच्या जोरावर ते जनतेपुढे जाऊ शकतात. त्यांनी 2019 मध्ये धारावीच्या विकासाचे आश्वासन दिले होते.
आता धारावीच्या विकासाचे काम अदानी समूहाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आश्वासनांची पूर्तता होत असल्याचा दावा ते करू शकतात. शिंदे गट सध्या एनडीएमध्ये सहभागी झाल्यामुळे आगामी निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ जर शिंदे गटास सुटला तर शेवाळे यांना खासदारकीची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. अजित पवार गट, भाजप या महायुतीतील पक्षांच्या ताकदीचा शेवाळे यांना आगामी निवडणुकीत फायदा करून घेता येणार आहे.
राहुल शेवाळे हे मतदारसंघात ग्राऊंडवर उतरून काम करताना दिसत नसल्याची तक्रार बऱ्याच मतदारांकडून केली जाते. याशिवाय धारावी विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिला होता. आता तो मार्गी लागताना दिसत आहे. मात्र तो प्रकल्प अदाणी समूहाला दिल्याने त्यावरूनही वाद निर्माण होताना दिसून येत आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. येथील गॅस आणि आईल कंपन्यांमुळे प्रदूषणचा मुद्दाही ऐरणीवर आहे. त्यामुळे जनतेमध्ये शेवाळे यांच्याबाबत नाराजी सूर असल्याची चर्चा आहे. त्यातच या मतदारसंघात शिवसेनेचा पारंपरिक मतदारवर्ग बहुसंख्य आहे.
मात्र, राहुल शेवाळे यांनी शिवसेना फुटीनंतर शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने आणि त्यानंतर झालेल्या राजकारणामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. याशिवाय शिंदे गट युतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार गट देखील महायुतीत सहभागी झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही महायुतीत लढावी लागणार आहे. त्यातच भाजप या मतदासंघातून आपला उमेदार देण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. याबरोबरच जागा वाटपामध्ये शिंदे गटाला हा मतदारसंघ सुटणार की नाही, याबाबत शाश्वती नाही. .
राहुल शेवाळे हे मागील दोन टर्म शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. मात्र आगामी निवडणूक ही शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीमार्फत लढवली जाणार आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आगामी निवडणुकीत वापरला जाईलच, याबाबत शाश्वती नाही. त्यातच शिंदे गटाने गेल्या निवडणुकीत शिवेसेनेने लढवलेल्या सर्व जागा लढवण्यार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, भाजपकडूनही मुंबईतील सहाही मतदारसंघांतून उमेदवारी देण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.
त्यामुळे आगामी काळात शेवाळे यांना उमेदवारी मिळणार का? यावर प्रश्नचिन्ह आहे. शिंदे गटाला जागा न सुटल्यास राहुल शेवाळे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महायुतीचे जागावाटप करताना शिंदे गटाला मुंबईतील किमान दोन जागा दिल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शेवाळे यांचा पत्ता कट होणार की विजयाची हॅटट्रिक करता येणार, याचे चित्र जागा वाटपानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, दक्षिण मध्य मुंबई हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, या मतदारसंघात शिवसेनेचा पारंपरिक मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून या मतदारसंघातून उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडीत सहभागी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून या मतदारसंघातून राज्यसभा खासदार अनिल देसाई यांचे नाव चर्चेत आहे.
कारण, काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनानंतर या मतदारसंघातून काँग्रेसकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे ठाकरे गट जागावाटपात या मतदारसंघातून दावा करू शकतो. त्यातच महायुतीमध्ये शिंदे गटास ही जागा सुटल्यास या मतदारंघात ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचा सामना रंगताना दिसून येईल.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.