मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे आरोप झालेले सुनील पाटील रविवारी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणात आपल्याचा अडकवण्याले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच मनिष भानूशाली याने आपल्याला एक ऑक्टोबरला दिलेल्या यादीत आर्यन खानचे नावच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनिल पाटील (Sunil Patil) हाच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा (Aryan Khan Drugs Case) मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर रविवारी खुद्द सुनिल पाटील यांनीच कंबोज यांचा दावा फेटाळून लावला आहे. पाटील हे रविवारी पहिल्यांदाचा माध्यमांसमोर आले. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सॅमने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन सुटका करून घेतल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
पाटील म्हणाले, मनिष भानूशाली याला ड्रग्ज पार्टीची माहिती मिळाली होती. त्यासाठी त्याने मला एक तारखेला लिस्ट पाठवली होती. ही लिस्ट सॅम डिसोझाला द्यायची होती. या लिस्टमध्ये आर्यन खान याचे नाव नव्हते. त्यामुळे काहीतरी गडबड झाल्याचे वाटत आहे. याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. ही लिस्ट मी उघड करणार आहे. याबाबतचे रेकॉर्डिंग व व्हॉट्सअॅप चॅट असल्याचा दावाही सुनिल पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, पाटील यांनी माध्यमांसमोर येत अनेक गोष्टींची पोलखोल केली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात डील झाल्याचेही त्यांनी सांगितले. सॅम डिसूझा, मनिष भानूशाली व किरण गोसावी यांच्यात डील झाले होते. मी 27 सप्टेंबर ते चार ऑक्टोबरपर्यंत अहमदाबादलाच होतो. त्यादिवशी मनिषने पहाटे अडीच वाजता याबाबत सांगितले. ते सर्वजण मुंबईत होते. सकाळी साडे आठ वाजता मला डील झाले असून 50 लाख टोकन दिल्याची माहिती त्याने दिली. पण त्यांची डील कधी झाली, काय झाले हे मला काहीच माहिती नाही.
सॅम डिसोझाबाबत गौप्यस्फोट करताना सुनिल पाटील यांनी एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सॅमशी माझा संबंध एक वर्षांपासून आहे. त्याला ड्रग्ज पार्टीची माहिती देण्याचा माझा एकच हेतू होता. त्याला चार महिन्यापूर्वी एका प्रकरणात एनसीबीने समन्स पाठवले होते. ते समन्स त्याने मलाही पाठवले होते. तो त्यावेळी स्टेटमेंट देऊनही आला होता. त्यानंतर मला पैशांसाठी फोन आला. एनसीबीला 25 लाख द्यायचे आहेत, असे सांगितले. पण माझ्याकडे एवढे पैसे नसल्याचे त्याला सांगितले. दुसऱ्यादिवशी त्याचा फोन आला. भाऊ तुम्ही पैसे नाही दिले तर माझे काम होणार नाही का? मी एनसीबीवाल्यांना पैसे दिले आणि सुटलो, असं सॅमने सांगितल्याचा दावा पाटील म्हणाले. हीच आठवण होती म्हणून मी धवल भानूसाली व नीरज यादवला सॅमची माहिती दिल्याचा दावाही पाटील यांनी केला.
या प्रकरणाचा मास्टरमाईंड कुणी वेगळंच आहे. मनिष भानुशालीशी माझा संबंध मित्र म्हणून गेल्या दहा-बारा वर्षांपासून आहे. एका टेंडरसंबंधात मी मनिषसोबत अहमदाबादला गेलो होतो. त्याचे गुजरातच्या मंत्र्यांशी संबंध आहेत. किरण गोसावीला मी चार सप्टेंबरपासून ओळखतो. घटना घडण्याच्या काही दिवस आधी ही ओळख झाली. 22 सप्टेंबरला आम्ही भेटलो. तिथून आम्ही परत आलो, असे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.