
Shankar Patole suspended : लाचलुचपत विभागाच्या मुंबई पथकाने ठाणे महापालिकेतील उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याविरोधात लाचखोरीची कारवाई झाली. यानंतर महापालिकेत पेढे वाटण्यात आले. एवढचं नव्हे, तर पाटोळे यांना पथक घेऊन जात असताना, त्यांच्या दिशेने निषेधार्थ म्हणून, फुलांची उधळण केली गेली.
तसंच जोरदार घोषणाबाजी झाली. यानंतर ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या कारभाराला तोंड फुटले. लाचखोरीची कारवाई झालेले उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याविरोधात आता आयुक्त सौरभ राव यांनी निलंबनाच्या कारवाईचा बडगा उचलला आहे. परंतु आयुक्त राव यांनी कारवाई करण्यापूर्वी राजकीय पक्षांनी केलेली टिका देखील चर्चेत आली आहे.
उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti corruption bureau) मुंबई पथकाने दोन दिवसांपूर्वी कारवाई केली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, त्याची गांभीर्यपूर्वक दखल घेत शंकर पाटोळे यांना 02 ऑक्टोबरपासून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त सौरभ राव यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश आज 04 ऑक्टोबरला जारी केला.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979च्या नियम 4 च्या अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांनुसार ठाणे महापालिका (thane municipal corporation) आयुक्त सौरभ राव यांनी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याविरोधात ही कारवाई केली. तसंच पाटोळे यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची देखील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. अधिकाऱ्यांच्या न्यायालयीन चौकशा सुरू असतानाच, बुधवारी मध्यरात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई पथकाने ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्याला लाचेप्रकरणी ताब्यात घेतले आहे. यानंतर ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या कारभाला तोंड फुटले. समाज माध्यमांवर भ्रष्टाचार कारभाराचे वाभाडे निघाले.
ठाणे शहरातील काँग्रेसचे मुख्य प्रवक्त राहुल पिंगळे यांनी पात्रता नसलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोप असलेले शंकर पाटोळे यांना ठाणे महापालिकेत उपायुक्तपदी बसविणे म्हणजे, ठाणेकर जनतेच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात होता. आयुक्तांनी राजकीय दबावाखाली घेतलेला हा निर्णय, पालिकेच्या प्रतिमेवर काळा डाग आहे, असा गंभीर आरोप केला होता.
काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, 2004 मध्ये उप समाजविकास अधिकारी म्हणून लागलेले पाटोळे, 2010 मध्ये समाजविकास अधिकारी झाले. त्यानंतर सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार म्हणून संवेदनशील प्रभाग समित्यांमध्ये काम करत त्यांनी पूर्ण वेळ सहायक आयुक्त पदाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला.
सहाय्यक आयुक्त पदावरील नियुक्तीस मान्यता मिळण्याबाबतच्या पालिकेच्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने माहिती सादर करण्यास सांगितले असता, प्रस्तावात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसल्याचा प्रथम अहवाल महापालिकेने दिला. याबाबतच्या दुसऱ्या अहवालात मात्र पाटोळे यांच्याबाबत बीएसयूपी अनियमितता, अॅन्टी करप्शन ब्युरोतील तक्रार, अनधिकृत बांधकामांना दिलेले संरक्षण तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारी प्रलंबित असल्याबाबत सादर केले.
परंतु, सरकारने पाटोळे यांच्या सहायक आयुक्तपदालाच मान्यता दिलेली नाही, हे धक्कादायक माहिती समोर आली. अशा स्थितीत त्यांची पदोन्नती ही पूर्णपणे बोगस व बेकायदेशीर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. याचबरोबर, शंकर पाटोळे यांची 2018 ते 2021 कालावधीत झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी सुरू असताना व सहायक आयुक्तपदाची शासन मान्यता नसताना पाटोळे यांना उपायुक्तपदी नेमले कसे? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.