मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे (Shiv Sena) नाव आणि चिन्ह गोठवल्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्यामुळे अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
शिवसेनेमध्ये बंड करुन एकनाथ शिंदे यांच्यासोहत ४० आमदार आणि १२ खासदार गेले आहेत. शिंदे यांनी खरी शिवसेना आपली असल्याचा दावा केल्यामुळे हा वाद निवडणूक आयोगात गेला. आयोगाने दोन्ही गटांना कागद पत्रे सादर करण्यास सांगितले. त्यानंतर तात्पूरत्या स्वरुपात चिन्ह आणि नाव गोठवले गेले आहे. शिंदे गटातील नेत्यांना शिवसेनेचे चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास वाटत होता.
मात्र, आयोगाने चिन्ह गोठवले. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न या नेत्यांपुढे आहे. कारण निवडणूक आयोगातील लढाई किती दिवस चालेल सांगता येत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहेच. ती टागती तलवार आमदारांवर आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सुरु असेलेले आरोप सुरु आहेत. शिवसैनिकांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आमदारांमध्ये धुसफूस वाढत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
त्यातच मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांचीही तगमग सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापर्यंत होणार नसल्याची चर्चा आहे. तर आता मंत्रिमंडळ विस्तार नाहीच, असेही सांगितले जात आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या ४० आमदारांना संधी देणे शक्य नाही. त्यावरुन काही आमदार नाराज होतील, त्यामुळे विस्तार पुढे ढकलायचा असा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते.
रविवारच्या बैठकीमध्ये आपल्या नेत्यांसमोर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, चिन्ह मिळाले नाही तर निवडणुकीमध्ये काय होईल, असा प्रश्न शिंदे गटातील नेत्यांच्या पुढे आहे. तसेच भाजपच्या वतीनेही काही मतदार संघावर दावा सांगितले जात आहे. त्यामुळे आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. तसेच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देऊ नये, असाही मतप्रवाह शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, निवडणुक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात दिले आहे. शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना) असे नाव देण्यात आले आहे. मात्र, त्यांना कोणतेही चिन्ह मिळालेले नाही. तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाले आहे. शिंदे गटाला मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत पुन्हा चिन्हांसाठी पर्याय देण्यास सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.