Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना आमदार सुनील राऊत यांच्या फोनवरुन ही धमकी देण्यात आली. राज्यातील दोन दिग्गज नेत्यांना धमकी देण्यात आल्याप्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांना सुनील राऊत यांच्या फोनवरुन ही धमकी देण्यात आली. त्यानंतर आता राऊतांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेजण हे गोवंडी परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. नशेच्या धुंदीत त्यांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधणे बंद न केल्यास गोळ्या घालण्याची धमकी संजय राऊतांना देण्यात आली होती.
या धमकीनंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राज्य सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत. "मला (संजय राऊत यांना) आलेली धमकी सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे", अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली.
राऊत म्हणाले, "मला आलेली धमकी ही सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ठाण्यातील एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीची माझ्यावर हल्याची योजना आहे", असा गंभीर आरोप त्यांनी केला.
"मागील अडीच वर्षात दंगली घडल्या नाहीत. शरद पवार यांना आणि मला (संजय राऊत यांना) आलेली धमकी ही अत्यंत गंभीर आहे. पण या प्रकरणाकडे सरकारने लक्ष घातलं नाही. दंगली घडवणाऱ्यांना पडद्यामागून प्रोत्साहन दिलं जात आहे. महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे", असा आरोपही त्यांनी केला.
"मला (संजय राऊत यांना) आलेल्या धमकीची सरकारने काळजी घ्यावी. दंगलीच्या आडून महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर नेण्याचा डाव आहे. आम्ही सत्तेत असताना असे प्रकार कधी घडले नाहीत. पण या दंगली आणि धमक्यामागे अदृश्य शक्ती काम करत आहे. या धमक्या अचानक आलेल्या नाहीत. हे मोठं षडयंत्र आहे", असंही संजय राऊत म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.