Mumbai : मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, मुंबईवर दिल्लीची अर्थात, मोदी-शाहांचा ‘डोळा’ आहे, मुंबईचे लचके तोडायचे आहेत...हे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे मोदी-शाहांवरचे जुने आरोप आहेत. मुंबई वेगळी करण्याचा मुद्दा पुढे आणून, तापवून ठाकरे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला चहूबाजुंनी घेरण्याच्या प्रयत्न आहेत. मात्र, मुंबई तोडण्याचा डाव दिल्लीत शिजत असल्याचा ठाकरेंचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पटलेला नाही‘असे काही दिल्लीच्या मनात नसल्याचे लिहून त्यांनी आपल्या पुस्तकातून ठाकरेंच्या आरोपातील हवाच काढून टाकली होती.
ठाकरे-पवारांमध्ये त्यावरून काही बिनसल्याचही चर्चा होती. परंतू, पवारांच्या भूमिकेकडे तेव्हा कानाडोळा केलेल्या ठाकरेंनी, पवारांशेजारी बसूनच मुंबई तोडण्याचा मुद्दा उकरला आणि त्यावरून थेट भाजपच्या सत्ताधीशांवर आरोपांची माळ लावली. यानिमित्ताने ठाकरेंनी पवारांचा हिशेब चुकता केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप (BJP) नेत्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव उघडा पडला असल्याची टीका केली.
ते म्हणाले, केंद्रातील भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातील आमचं महाविकास आघाडीचं सरकार का पाडलं हे आता सर्वसामान्य लोकांच्याही लक्षात यायला लागले आहे. कारण मी मुख्यमंत्री होतो, तसेच इथे माझे सहकारी असलेले बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण, आदित्य ठाकरे बसलेले आहेत. तसेच नाना पटोले तर अध्यक्ष होते.
आमचं आघाडी सरकार राज्यात असताना त्यांचं केंद्रात सरकार होतं. पण तरीदेखील असा कोणताही प्रस्ताव आणण्याचं धाडस त्यांनी केलं नव्हतं. मुंबई वेगळं करणं किंवा मुंबई केंद्रशासित प्रदेश करणं हा त्यांचा डाव आता उघड झालेला आहे. पण आम्ही सत्तेत असताना असा प्रस्ताव आणण्याची हिंमत त्यांची झाली नव्हती. आणि आत्तासुध्दा आम्ही असा प्रस्ताव होऊ देणार नाही असेही ठाकरे म्हणाले.
ज्याक्षणी आमचे सरकार केंद्रात आणि राज्यात येईल त्याक्षणी हे जे काही आहे, त्यांचे पाश आम्ही तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. मुंबईची जी काही स्वायत्ता आहे. महाराष्ट्रासह असे जे काही राज्य आहेत त्यांची स्वायत्ता अबाधित ठेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नीतीआयोगाने मुंबईमध्ये विकास करण्यासाठी एक आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्रामध्ये खासकरुन केंद्र विशेष दखल घेत आहे. हा मुंबई महाराष्टापासून तोडण्याचा डाव आहे असं तुम्हांला वाटतं का या प्रश्नावर उध्दव ठाकरें( Uddhav Thackeray)नी उत्तर देताना केंद्रावर हल्लाबोल केला.
ठाकरे म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने दिल्लीपासून याची सुरुवात केली. दिल्लीसाठी तिथे जो काही वटहुकुम आणला. त्याचवेळी आमच्या मनात भीती होती. हे सगळं जणं, आपल्या देशाला केंद्र सरकार नाही तर संघराज्य पध्दतीचं सरकार म्हणतो. कारण प्रत्येक राज्याला समान अधिकार आहेत.
दोन तीन मोजक्या गोष्टी सोडल्या तर आणि तरच केंद्राला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. हा हस्तक्षेप दिवसागणिक ते वाढवतच चालला आहे. राज्य आणि शहरांची स्वायत्ता मारून त्यांना एकछत्री कारभार त्यांना आणायचा आहे. आम्ही ती छत्री मोडून तोडून टाकणार आहोत असा घणाघातही ठाकरेंनी केला.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी 'लोक माझे सांगाती'मध्ये मांडून याबाबत सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेच्या आरोपांमधील हवाच काढून टाकली आहे. पण आता केंद्रातील भाजप नेत्यांचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव उघडा पडला असल्याचा आरोप ठाकरेंनी पवारांच्या शेजारी बसूनच केला आहे. यावर पवार काय भूमिका मांडतात हे महत्वाचे ठरणार आहे.
'लोक माझे सांगाती' मध्ये काय म्हटलंय..?
शिवसेनेच्या प्रचाराचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव हा मुद्दा गेली अनेक वर्षे कळीचा असतो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगांती या पुस्तकात हा ठाकरेंचा दावा खोडून काढणारी भूमिका घेतली आहे. या पुस्तकातील ४१७ पानावर 'मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो', असं पवारांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.