Uddhav Thackeray On BJP : उद्धव ठाकरेंनी दाबली होती भाजप, संघाची दुखरी नस...

Mahavikas Aghadi And Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील टीकेवरून भाजपने शिवसेनेला घेरले होते.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : गेल्या वर्षी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यावरून राजकीय घमासान झाले होते. सावरकरांचा वापर सोयीनुसार करणाऱ्या भाजपने ही संधी साधून उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसला खडेबोल सुनावले होते. त्याचबरोबर भाजपची दुखरी नस दाबून जशास तसे उत्तर दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी हे सावरकर यांच्यावर सतत टीका करत असतात. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाही सहभागी होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सावरकर यांच्यावरील टीकेमुळे शिवसेनेची कोंडी होऊ लागली. शिवसेनेने हिंदुत्व सोडले हे अधोरेखित करण्यासाठी भाजपने ही संधी वारंवार साधली. विशेष म्हणजे, भाजपनेही सावरकरांना सोयीनुसार स्वीकारले आहे, त्यांच्या आधुनिक विचारांचा भाजपला सातत्याने विसर पडतो. असे असतानाही राहुल गांधी यांनी टीका केली, की भाजपने काँग्रेससह शिवसेनेलाही घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Uddhav Thackeray
Udayanraje Bhosale : मनोज जरांगेंना उदयनराजे भोसलेंचे बळ; साताऱ्यात नेमकं काय घडलं ?

भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत काही अंतर पायी चालले होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरे यांना मिठी मारली होती. त्यावरून भाजपने शिवसेनेवर (ठाकरे गट) निशाणा साधला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी मिठी मारली होती. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका काय, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला होता.

राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील टीकेवरून भाजपने शिवसेनेवर अशी टीका पहिल्यांदाच केली नव्हती. यापूर्वीही शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता. शिवसेनेने हिंदुत्व सोडले, हे जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी भाजपने अनेक क्लृप्त्या केल्या. हाही त्याचाच एक भाग होता. हे करताना आता हिंदुत्व मानणारा भाजप एकमेव पक्ष आहे, असाही संदेश द्यायचा होता. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुखरी नस दाबून त्यांना खडेबोल सुनावले होते.

Uddhav Thackeray
Marathwada Sugarcane FRP : तीन हजार `एफआरपी` साठी अमित देशमुखांच्या खासगी कारखान्याचे गाळप बंद पाडले..

उद्धव ठाकरे म्हणाले होते, ''आम्हाला सावरकरांबद्दल अतीव प्रेम, श्रद्धा आणि नितांत आदर आहे. आमची ही श्रद्धा कुणीही कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. मात्र, स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा ? देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी ज्यांचा सुतराम संबंध नाही, त्या मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम दाखवणे, हे हास्यास्पद आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी आम्ही तर नव्हतो. मात्र, आरएसएस स्वातंत्र्यलढ्यात कुढे होती? '' असा प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच घेरले होते.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून अंतर ठेवणाऱ्यांना सावरकर यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. ज्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी त्याग केला, तेच स्वातंत्र्य आता धोक्यात आले आहे. ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. त्यामुळे भाजपने बाष्कळपणा बंद करावा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले होते. आधी तुमचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सांगा आणि नंतर आम्हाला प्रश्न विचारा, असेही ते म्हणाले होते.

स्वातंत्र्यलढ्यात सहभागाचा मुद्दा ही भाजपची दुखरी नस आहे. भाजपशी बिनसल्यापासून ही नस दाबण्याची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. माझे हिंदुत्व शेंडी-जाणव्याचे नाही, सर्वसमावेशक आहे, हेही उद्धव ठाकरे वारंवार सांगत असतात. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा स्वीकारलेला हा वसा भाजपची कोंडी करणारा ठरला आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला राज्यातही मोठा प्रतिसाद मिळाला होता. राहुल यांच्या सावरकरांवरील टीकेला पुढे करून भाजपने त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे गटाने राहुल गांधी यांनाही निर्वाणीचा इशारा देत स्वातंत्र्यवीरांवर टीका सहन करणारा नाही, असे सुनावले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Akola Rape : क्रूरतेचा कळस! सिगारेटचे चटके देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुंडनही केले... ‘वंचित’चा पोलिस ठाण्यात ठिय्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com