Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी आपला पारंपारिक मित्रपक्ष राहिलेल्या भाजपची साथ सोडत 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर ठाकरे आणि भाजपमधील दरी वाढली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हा दुरावा आणखीच वाढला. लोकसभा विधानसभांसह अनेक सभा,पत्रकार परिषदांमधून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठाकरेंनी सातत्यानं मोदी-शाह यांच्यावर टीकेची झोड उठवत असतात. पण आता ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठं विधान केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बुधवारी (ता.17) वाढदिवस आहे. दरवर्षी मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरासह जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात असतो. तसेच राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. पण विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी उद्धव ठाकरेंनी जवळीक वाढवल्याची चर्चा आहे. अशातच आता ठाकरेंनी मोदींबाबत मोठा दावा केला आहे.
याचदरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना दुश्मन मानत नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना मी दुश्मन मानत नाही,पण ते मानत असतील, ते शिवसेना तोडत आहेत, तरीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, अशी मिश्किल टिप्पणीही ठाकरेंनी मोदींना शुभेच्छा देताना केली.
ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, पण मी त्यांना दुश्मन मानत नाही. हे राजकारण आहे, ते शिवसेना तोडत आहेत ते कोणीही सहन करु शकत नाही. त्यांच्या मनात पाप असेल तरीही मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असंही त्यांनी विधान केलं.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना पक्षाबाबत घेत असलेली भूमिका मला मान्य नाही. मोदी शिवसेना तोडायला संपवायला निघाले आहेत. ते कोणालाही सहन होणार नाही. तरीही त्यांनी देशाचा कारभार चांगला करावा, अशा मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असं उद्धव ठाकेरंनी स्पष्ट केलंय.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिवमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींच्या वाढदिवसासह शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल आणि पंचनाम्यावरही भाष्य केलं.
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, देवाभाऊंच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये उधळतात, तेच कोट्यवधी रुपये तुम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिले असते, तर काय बिघडलं असतं? असा सवालही ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, त्याचे पैसे आले कुठून हा पंचनामा कोण करणार? पैसे दिले कोणी? त्याची जाहिरात कशासाठी केली? छत्रपती शिवरायांच्या चरणी फुलं वाहताना किंवा हार घालताना जाहिरात करायची, ती करोडो रुपयांची जाहिरात होती. सर्व वृत्तपत्रांत जाहिराती होत्या. हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी उधळत असाल, ते करोडो रुपये तुम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिली असती, तर काय बिघडलं असतं? असा संतप्त सवालही ठाकरेंनी केला.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीनं मदत करायला हवी होती, तुमच्याकडे पैसे आहेत. पण जर कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करता हे जे मी म्हणतो ते याबद्दल असते. त्या जाहिरातीची गरज काय होती. त्याऐवजी सरकारनं तातडीने मदत करायला हवी होती, असा रोखठोक सवालही उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.