
Mumbai, 03 December : विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे खडबडून जागे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘मिशन मुंबई महापालिका’ हाती घेतले आहे. भक्कम बहुमतामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीकडून राज्यातील महापालिका निवडणुका घेण्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि सहकारी यांनी मुंबई महापालिकेच्या तयारीला आतापासूनच सुरुवात केली आहे. ठाकरेंनी महत्वाच्या शिलेदारांवर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जबाबदारीही सोपवली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (Shivsena UBT) चांगल्या जागा मिळाल्या. मात्र, सत्तेचे कोणतेही केंद्र हाती नसल्याने मुंबई महापालिका हातची जाऊ नये, यासाठी ठाकरेंनी आतापासूनच राजकीय फेरमांडणी करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीसंदर्भातील बैठक झाली असून त्यात महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. माजी नगरसेवकांना आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश ठाकरेंनी दिले आहेत.
शिवसेनेच्या बैठकीत बहुतांश माजी नगरसेवकांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा आग्रह धरला आहे. मात्र, लोकसभेच्या 48, विधानसभेच्या 288 आणि मुंंबई महापालिकेच्या 227 जागांवर निवडणूक लढविण्याबाबतचा विचार त्या त्या वेळी करण्यात येईल. पण आपण सर्वांनी आपल्या प्रभाग मजबूत केला पाहिजे, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.
दरम्यान, मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास मर्जीतील शिलेदारांवर विभागनिहाय जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे (कुर्ला, विक्रोळी), माजी मंत्री अनिल परब : (मलबार हिल, कुलाबा), मिलिंद नार्वेकर (शिवडी, माहीम), वरुण सरदेसाई (कलिना, वांद्रे पश्चिम), विश्वनाथ नेरुरकर (विर्लेपार्ले, चांदिवली), रवींद्र मिर्लेकर (वांद्रे पूर्व, वरळी), अमोल किर्तीकर (दहिसर, मागाठाणे), दत्ता दळवी (जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी), सुनील राऊत (वडाळा, भायखळा).
सुनील शिंदे (मुलुंड, भांडुप पश्चिम), बाळा नर (चारकोप, मालाड पश्चिम), बबनराव थोरात (अंधेरी पूर्व, अंधेरी पिश्चम), शैलेश परब (बोरीवली, कांदिवली पूर्व), उद्धव कदम (धारावी, सायन-कोळीवाडा), विलास पोतनीस (वर्सोवा, गोरेगाव), सुहास वाडकर (घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व), शैलेश फणसे (मानखुर्द शिवाजीनगर, मुंबादेवी), संजय घाडी (अणुशक्तीनगर, चेंबूर) आदींवर उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.