Shivsena Ministers in Cabinet : समाधानकारक काम न केलेल्या शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून वगळा, असा आदेश भाजपश्रेष्ठींनी दिल्याची चर्चा आहे. भाजपने दिलेल्या या अल्टीमेटममुळे शिंदे गटातील मंत्र्यांवर गच्छंतीची टांगती तलवार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता. १२) रात्री तातडीची बैठक घेतली. शिंदे गटाच्या या बैठकीत भाजपच्या अल्टीमेटमवरच चर्चा झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)
वर्षभरापूर्वी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले होते. त्या बंडावेळी खंबीरपणे साथ देणाऱ्या सहकाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. आता त्या मंत्र्यांच्या कामगिरीवर भाजपश्रेष्ठी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना हटवण्याच्या सूचना भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या आहेत. दरम्यान, बंडात साथ देणाऱ्यांकडूनच अवघ्या दहा महिन्यांत मंत्रिपद कसे काढून घ्यायचे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला आहे. यातून कसा आणि काय मार्ग काढायचा यावरच शिंदे गटात खल सुरू आहे. परिणामी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची माहिती आहे.
राज्यातील मंत्र्यांच्या कामावर भाजपची (BJP) एक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. त्या यंत्रणेमार्फत राज्यातील मंत्र्यांचे अहवाल भाजप हायकमांडकडे पाठविले जातात. या अहवालात शिंदे गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उत्पादन व शुल्कमंत्री शंभुराज देसाई, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, संदीपान भुमरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नकारात्मकता दर्शवली आहे.
संबंधित मंत्र्यांच्या कार्यपद्धती विरोधात भाजपच्या अनेक आमदार, खासदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे अमित शाह (Amit Shah) प्रचंड नाराज आहेत. यातूनच मंत्र्यांना हटवण्याच्या सूचना शहा यांनी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता भाजपच्या सूचनेनुसार पहिल्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांवर निर्णय घेण्याबाबत शिंदे गटात चर्चा सुरू आहेत. तसेच त्यांच्याजागी मंत्रीपदासाठी पर्यायी चेहरे शोधण्याचेही दिव्य मुख्यमंत्री शिंदे यांना पार पाडावे लागणार आहे. परिणामी रखडलेलाय दुसरा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लाबंणीवर पडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.