

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी प्रथमच भूमिका मांडली आहे. आपण महिला डॉक्टरवर हात उगारलेला नसून सीसीटीव्हीतील दृश्य कॅमेरा अँगलमुळे तसे दिसत असावे, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या आईने रुग्णालयात वेळेत उपचार व बेड उपलब्ध न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
"त्या ठिकाणी जी घटना घडली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, महिला डॉक्टरवर हात उगारलेला नाही. संबंधित डॉक्टर माझ्या मुलीसारख्या आहेत. त्या फोनवर बोलत असल्याने 'आधी आमची तक्रार ऐका, फोन बाजूला ठेवा' एवढेच मी त्यांना सांगितले होते. सीसीटीव्हीमध्ये जे दिसत आहे, ते कॅमेरा अँगलमुळे तसे दिसत असावे," असे म्हात्रे यांनी सांगितले.
"आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. महिलेवर हात उचलण्याचा प्रश्नच येत नाही. रुग्णालयात काही कमतरता असतील, तर त्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन," असेही त्यांनी नमूद केले. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून वारंवार फोन येत होते. डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आपण रुग्णालयात गेलो, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, रुग्णाच्या आई साधना कारंडे यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले. "माझ्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर होती. सायंकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास आम्ही शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झालो. मात्र, बेड उपलब्ध नसल्याचे सांगत सहा ते नऊ वाजेपर्यंत मुलीला तशीच ठेवण्यात आले. आम्ही डॉक्टरांना विनवण्या केल्या, पाया पडलो; मात्र उपचार सुरू झाले नाहीत," असा आरोप त्यांनी केला.
"खासगी रुग्णालयात नेण्याची आर्थिक क्षमता नव्हती. पावसामुळे सायन रुग्णालयात जाणेही शक्य नव्हते. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने आम्ही रमेश म्हात्रे यांना संपर्क केला. त्यांनी डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रतिसाद दिला जात नव्हता. शेवटी नंतर म्हात्रे यांनी मुख्य मॅडम यांना फोन केला त्यानंतर मुलीला कल्याण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. जर कल्याणला हलविणे शक्य होते, तर सुरुवातीपासून सायन रुग्णालयातच जाण्याचा आग्रह का धरला जात होता?" असा सवाल कारंडे यांनी उपस्थित केला.
या प्रकरणी डॉक्टरांवरील कथित मारहाणीबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच रुग्णालयातील उपचार प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या आरोपांचीही स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत रुग्णसेवा करत असून, त्यांच्यावर हात उचलणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.