Dombvili News : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या असल्याने या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर नेहमीच आरोप करीत असतात, तर दुसरीकडे शिवसेनेतील फाटाफुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गटातील नेतेमंडळीत आडवा विस्तवही जात नाही. दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची नेहमीच संधी शोधत असतात.
महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांनी विरोधी पक्षातील संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची मिमिक्री करत त्यांच्यावर निशाणा साधला. याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर देताना दरेकर यांच्या आडून थेट ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नेते संजय राऊत यांच्यावर शाब्दिक वार केले. मी त्यांची चुकी मानत नाही. जसे बॉस वागतो तसे बिचारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना करावे लागते. निवडणूक झाल्यावर त्यांच्याकडे तेच काम उरेल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. (Shrikant Shinde News)
कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या अंबरनाथ येथे प्रचारासाठी गेल्या असता, त्यांनी महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ज्यांना अ ब क येत नव्हते. त्यांना ते शिवसेनेने शिकवले. अ ब क काय म्हणजे काय? आपण जे काम करतोय, आपल्याकडील सध्याची परिस्थिती किंवा समाजामध्ये जे काय चाललंय याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये क्लीअर असतात, तो कधी 'या ठिकाणी, त्या ठिकाणी' मग असे करत नाही, असे नक्कल करून दाखविले.
आज मी अंबरनाथमध्ये आले, अंबरनाथमध्ये लोकांचे प्रश्न काय आहेत ? मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही इथे विचारलं ना की अंबरनाथमधील प्रश्न काय? तर तो तुम्हाला झटपट सांगेल. कारण तो रोज अंबरनाथमध्ये रस्तो रस्ते फिरतोय. तो अनुभवतोय. जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विषय क्लीअर असतात, असे म्हणत वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत मिमिक्री केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याला उत्तर देताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, मी त्यांची चुकी मानत नाही. त्या या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण ज्याप्रमाणे बॉस वागतो, बॉस शिकवतो, त्याप्रमाणे बिचारे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना करावं लागतं. आता त्यांना तेच कामधंदे उरणार आहेत. त्यांनी मिमिक्री करण्याचा प्रत्येक सभेमध्ये सुरू केलेला आहे. मला वाटतं ही निवडणूक झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे आहे ते उरणार आहे, असे सांगत ठाकरे गटाचा समाचार घेतला.
(Edited By : Sachin Waghmare)
R