
Mumbai, 09 February : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आणि पत्नीही निवडून आलेली नव्हती. आम्ही राज ठाकरे आणि आमचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जीवावर निवडणूक लढवली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर लग्नगाठ बांधल्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला मतं मिळालेली आहेत. अजित पवारांनी स्वतःच्या जीवावर उभं राहावं आणि त्यानंतरच वल्गना कराव्यात, असा पलटवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केले होते. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या जागा आणि शरद पवारांच्या पक्षाचे अपशय याबाबत वक्तव्य केले होते. त्याला अजित पवार यांनी उत्तर देताना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही. आम्हाला काय बोलता?, असा सवाल केला हेाता. त्याला मनसेकडून संदीप देशपांडे यांनी उत्तर देताना अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
संदीप देशपांडे (Sandeep Deshmande) म्हणाले, आम्ही जी काही निवडणूक लढवली आणि आम्हाला जी काही मतं मिळाली आहेत, ती राज ठाकरे यांच्या जीवावर आणि आमच्या पक्षाच्या जीवावर मिळालेली आहेत. पण, भाजपचा पदर पकडला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मतं मिळालेली नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना किंवा त्यांच्या पक्षाला जी मतं मिळालेली आहेत, ती भाजपबरोबर लग्नगाठ बांधली आहे, त्यामुळे मिळालेली आहेत. अजित पवार यांनी उद्या स्वतःच्या जीवावर उभं राहावं आणि त्यानंतरच अशा ह्या वल्गना कराव्यात, असे आव्हानही संदीप देशपांडे यांनी अजित पवार यांना दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटना बांधणीकडे आमचं लक्ष आहे. त्यासंदर्भात राज ठाकरे हे मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांना उत्तर द्यायला मी लहान : अमित ठाकरे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेवर बोलताना अमित ठाकरे यांनी ‘अजित पवारांना उत्तर द्यायला मी फार लहान आहे. राज ठाकरेच त्यांना उत्तर देतील,’ असे स्पष्ट केले हेाते. मात्र पराभावामुळे मी खचलो नाही. पण, शिकायला खूप मिळालं. माझी ही पहिलीच निवडणूक होती. माझ्या पहिल्या नाही, तर शेवटच्या निवडणुकीत मला जज करावे, अशी माझी इच्छा आहे, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले होते.