Water Problem News : मनमाड शहराला लागलेला पाणीटंचाईचा कलंक लवकरच पुसला जाणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी योजनेचे भूमिपूजन झाले. योजनेच्या कामाला युद्ध पातळीवर सुरूवात झाली आहे. त्यामुळे मनमाडकरांना आता पाण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार नसून दररोज पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या प्रयत्नातून करंजवण-मनमाड पाणी योजनेसह, नांदगाव येथील शिवसृष्टी व विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे हस्ते पार पडला.
यावेळी करंजवन योजनेसाठी पालिकेला द्यावा लागणारा १५ टक्के स्वनिधी सरकार भरणार आहे. ट्रामा केअर सेंटर, मनमाड नगरपरिषद कार्यालयासाठी तातडीने १० कोटी रुपये व एम.आय.डी.सी.साठी महिनाभरात भूसंपादनाचे काम सुरू करण्यात येईल. मागील सरकारच्या अडीच वर्ष काळातील बंद पडलेल्या सर्व योजना मार्गी लावल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुहास कांदे, अंजुम कांदे, युवासेनेचे जिल्हा अधिकारी फरहान खान, बाळासाहेबांची शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुहास कांदे म्हणाले की, "मनमाडचा पाणीप्रश्न ७० वर्षापासून रखडलेला होता. सर्वांनी प्रयत्न केले. हा प्रश्न मिटला नाही. नैसर्गिक स्त्रोत नसल्याने पाणी नव्हते. अनेकांनी आंदोलन, मोर्चे, उपोषण केले. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला. मनमाडला एमआयडीसी झाल्यास बेरोजगारी मिटण्यास होईल."
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांच्या ५० टक्के समस्या कमी होणार आहेत. या योजनेसोबतच ग्रामीण पुरवठा विभागाच्या वतीने देखील ५०० पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमुळे मनमाडच्या विकासात भर पडणार आहे."
कांदेंचे विरोधकांना टोले
आमदार सुहास कांदे म्हणाले की, इथे मोठ्या मंत्र्यांचा मुलगा १० वर्षे आमदार होते. त्यांना साधा शिवपुतळा उभारता आला नसल्याचा टोला माजी आमदार पंकज भुजबळ यांना लगावला. तर बड्या मंत्र्याने छातीठोकपणे सांगितले होते की मनमाडचा पाणीप्रश्न सोडवला नाही तर नाव लावणार नाही, असे म्हणणाऱ्यांनी काहीच केले नाही, असा टोला छगन भुजबळ यांना लगावला. आदित्य ठाकरे म्हणाले की, करंजवन योजना उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांना माहीत नाही की २५ वेळा त्यांच्याकडे गेलो, त्यांनी सही केली नाही. शेवटी २६ व्या वेळी निवेदन फाडून फेकले. त्यामुळे या युवानेत्याने या योजनेचा अभ्यास करावा.
यावेळी अनेकांनी बाळासाहेबांची शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, माजी नगराध्यक्ष बाळकाका कलंत्री, ठाकरे गटाचे नगरसेवक महेंद्र शिरसाठ, भाजपचे नागापूरचे थेट सरपंच राजेंद्र पवार यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.