

Navi Mumbai News: आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. मात्र, यंदा या योजनेसाठी अर्ज करताना नव्या कागदपत्रांची अट घालण्यात आल्याने गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र असूनही अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या योजनेला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षी सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. पहिलीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. मात्र, यंदा कागदपत्रांच्या अटींमध्ये बदल झाल्याने अर्जदारांची संख्या घटण्याची शक्यता आहे.
विशेषतः झोपडपट्टी, गावठाण आणि विस्तारित गावठाणांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना या नियमांचा फटका बसू शकतो. नवी मुंबईत अनेक कुटुंबे भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्यास आहेत. काही इमारतींमध्ये मालमत्ता कर भरला जात नसल्याने रहिवाशांकडे संबंधित पावत्या उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करणे कठीण होऊ शकते. परिणामी, आर्थिक मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांचीच अडचण वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षापर्यंत शिष्यवृत्तीसाठी नवी मुंबईतील रहिवासाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची माहिती आणि भाडेकरार यांसारखी कागदपत्रे सादर करावी लागत होती. यंदा त्यामध्ये पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरल्याच्या पावत्यांची भर पडली आहे. याशिवाय नगरसेवकाचे शिफारसपत्रही आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक किचकट झाल्याचे चित्र आहे.
महापालिकेने या योजनेत विद्यार्थ्यांचे एकूण १३ गट केले आहेत. यामध्ये आर्थिक दुर्बल घटक, विधवा किंवा घटस्फोटित महिलांची मुले, मागासवर्गीय विद्यार्थी, सफाई कामगारांची मुले, दगडखाण कामगारांची मुले आणि आदिवासी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षणाच्या टप्प्यानुसार विद्यार्थ्यांना चार हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, कर आणि पाणीपट्टीच्या पावत्यांची अट पूर्ण करता न आल्यास पात्र विद्यार्थ्यांनाही अर्ज करताना अडथळे येऊ शकतात. त्यामुळे नव्या नियमांचा गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.